एमपीएससीचा डाटा हॅक करणारा जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमपीएससीचा डाटा हॅक करणारा जेरबंद
एमपीएससीचा डाटा हॅक करणारा जेरबंद

एमपीएससीचा डाटा हॅक करणारा जेरबंद

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर टाकण्यात आलेले संयुक्त पूर्व परीक्षेचे तब्बल ९४ हजार १९५ हॉल तिकीट बेकायदा डाऊनलोड करून ही हॉल तिकिटे टेलिग्राम चॅनेलवर बेकायदा प्रसारित करणाऱ्या हॅकरला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पुणे येथून अटक केली आहे. रोहित दत्तात्रय कांबळे (१९) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी रोहित कांबळे हा डार्कनेटवरील काही हॅकर्ससोबत संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्याकडून रोहितला तब्बल ४०० डॉलरची सुपारी मिळाल्याचे तपासात आढळून आल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट ‘ब’ आणि गट ‘क’ च्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या परीक्षार्थींचे प्रवेशपत्र २८ एप्रिल रोजी संकेतस्थळावर टाकले होते. हॅकरने आयोगाने वेबसाईटवर टाकलेल्या बाह्यलिंकमध्ये बेकायदा प्रवेश करून त्यातील माहिती अवैधरित्या प्राप्त केली. त्याद्वारे संकेतस्थळावरील तब्बल ९४ हजार १९५ परीक्षार्थींचे हॉल तिकीट डाऊनलोड केले होते. त्यानंतर हॅकरने आयोगाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड केलेला परीक्षार्थ्यांच्या हॉल तिकीटाचा डाटा एमपीएससी २०२३ ‘ए’ या टेलिग्रामच्या चॅनेलवर बेकायदा प्रसारित केला होता.

आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. या तपासात सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे व त्यांच्या टीमने या प्रकरणाचा सखोल तांत्रिक तपास करून संशयित आरोपी रोहित दत्तात्रय कांबळे याला पुण्यातील चिखली, पाटील नगर येथून बुधवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत रोहित कांबळे याने त्याच्या साथीदारासह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्याला २७ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

------------------
सायबर सिक्युरिटीचे कोर्स
पोलिसांनी केलेल्या चौकशीत रोहित कांबळे हा बीएससीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असून त्याने सायबर सिक्युरिटीचे विविध प्रकारचे कोर्सेस केल्याचे तपासात आढळून आले आहे. तसेच तो डार्क नेटवरील काही हॅकर्ससोबत संपर्कात असल्याचे तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी रोहित कांबळे याच्या घरातून गुन्ह्यात वापरलेले एक डेस्कटॉप, एक लॅपटॉप, तीन मोबाईल व एक इंटरनेट राऊटर जप्त केले आहे.