
एसी लोकलद्वारे ३२.२२ कोटींची कमाई!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : वाढलेला उकाडा त्यात सामान्य लोकलने दाटीवाटीने होणारा प्रवास मुंबईकरांना असह्य होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांचा प्रवास अल्हाददायक आणि गारेगार व्हावा, यासाठी सुरू केलेल्या वातानुकूलित (एसी) लोकलला गेल्या पाच महिन्यात प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने मध्य रेल्वेला ३२.२२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या पाच महिन्यांत एसी लोकलमधून ७१ लाख ३३ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे.
मध्य रेल्वेवर सध्या दिवसाला चार एसी लोकलच्या ५६ फेऱ्या चालविण्यात येतात. सीएसएमटी-ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा या दरम्यान या लोकल धावतात. सध्या या लोकलचा दररोज ५८ हजारांहून अधिक प्रवासी लाभ घेतात. रेल्वे प्रशासनाने ५ मे २०२२ पासून एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केली. त्यानंतर एसी लोकलची प्रवासी संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे १ जानेवारी ते २४ मे २०२३ पर्यंत ७१ लाख ३३ हजार प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केल्याची नोंद झाली आहे.
२२८ टक्के वाढ
यंदाच्या मे महिन्यात एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन सरासरी संख्या ५८ हजार ८८० वर पोहोचली आहे. मागील वर्षातील याच कालावधीतील प्रवासी आकडेवारीची तुलना केल्यास यंदा एसी लोकलच्या प्रवाशांच्या संख्येत झालेली वाढ उल्लेखनीय आहे. १ मे २०२२ ते २४ मे २०२२ या कालावधीत अंदाजे ६.१७ लाख प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला होता. याउलट २०२३ मध्ये याच कालावधीत प्रवाशांची संख्या १४.१४ लाखांपर्यंत गेली आहे, जी २२८ टक्क्यांनी वाढली आहे.
एसी लोकल दृष्टिक्षेप
महिना प्रवासी संख्या महसूल दैनंदिन प्रवासी
जानेवारी १३.४९ लाख ५.८१ कोटी ४३,५३०
फेब्रुवारी १३.५० लाख ५.९४ कोटी ४८,२२५
मार्च १५.१८ लाख ६.७३ कोटी ४८,९८९
एप्रिल १५.०३ लाख ७.०८ कोटी ५०,१०३
मे १४.१३ लाख ६.६६ कोटी ५८,८८०