
आपदा मित्रांचीही जी २० परिषदेमुळे क्षमतावाढ
मुंबई, ता. २५ ः जी-२० परिषदेअंतर्गत आपत्ती घटवण्यासंदर्भातील कार्यकारी गटाच्या मुंबईतील बैठकांमुळे या गटातील देशांचा अनुभव वाढला आहे. शिवाय मुंबई महापालिकेच्या एक हजार आपदा मित्रांचीही क्षमतावाढ झाली. या परिषदेअंतर्गत मुंबईत गेले दोन आठवडे तीन गटांच्या परिषदा झाल्या. त्यातील तिसरी व शेवटची आपत्ती घटविण्यासाठीची परिषद आज (ता. २५) संपली. त्याबाबतची माहिती नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे सदस्य सचिव कमल किशोर, सदस्य कृष्णा वत्स, मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे महेश नार्वेकर यांनी आज दिली.
आपत्ती कमी करण्यासाठी नेमके काय करावे, यासंदर्भात अर्थसाह्य करण्याच्या पद्धती, खासगी क्षेत्राचा अनुभव, त्यांची तयारी, सरकारी यंत्रणांकडून त्यांच्या अपेक्षा, गरीब देशांचे विमाछत्र वाढवण्याची गरज, अर्थसाह्यासाठी पीपीपी मॉडेल वापरण्याची गरज, धोक्यांसंदर्भातील इशारे केवळ सरकारी यंत्रणांना न मिळता सर्वसामान्यांनाही मिळण्याची आवश्यकता या सर्व मुद्यांबाबत अनेक देशांच्या अनुभवातून सर्वांनाच माहिती मिळाली, असे कमलकिशोर म्हणाले.
मुंबई महापालिकेनेही अनेक वर्षे आपत्ती निवारणासाठी बरेच उपाय योजल्याने त्याबाबतही जी-२० देशांच्या व आमंत्रित देशांच्या प्रतिनिधींनी माहिती घेतली. त्या प्रतिनिधींनी महापालिकेच्या कंट्रोल रूमचे कामही पाहिले. आपत्तीच्या वेळी काम करण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी एक हजार आपदा मित्रांना प्रशिक्षण देऊन तयार केले आहे. हे आपदा मित्रही या परिषदेत सहभागी झाले होते. त्यांनी परदेशी प्रतिनिधींशी चर्चा केल्याने त्यांचीही क्षमतावाढ झाली. तज्ज्ञांच्या अनुभवाचे व ज्ञानाचे आदानप्रदान झाल्याने आमची सध्याची यंत्रणा अधिक अचूक व परिपूर्ण करण्यात आम्हाला मदतच होईल, असे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे महेश नार्वेकर म्हणाले.