किमान ६० हजार घरात भाजपचा ‘संपर्क’

किमान ६० हजार घरात भाजपचा ‘संपर्क’

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई, ता. २५ : मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असताना भाजपने जनसंपर्क मोहिमेची आखणी केली असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या किमान ६० हजार घरांशी संपर्क साधण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हाती घेतला आहे. सामान्यत: प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ७० ते ७५ हजार घरे असतात. त्यातील किमान ६० हजार घरात मोदींच्या कार्यकाळात झालेली कामे, घेतलेले निर्णय यांची माहिती पोहोचवली जाणार आहे.

केवळ माहितीपत्रके पोहोचवणे एवढ्यावरच हा संपर्क मर्यादित राहणार नसून या कुटुंबाशी संवाद, त्यांच्या अडचणी, मोदी सरकारच्या योजनांचा त्यांना होऊ शकणारा लाभ, त्यांच्या अपेक्षा याबद्दलही संवाद साधला जाईल. गेल्या काही दिवसात चंद्रशेखर बावनकुळे यांनी विस्तारित कार्यकारिणी तसेच अनेक विषयांवर काम केले आहे. भाजपचा कोणताही कार्यकर्ता नाराज होऊ नये यासाठी सर्वसमावेशक जम्बो पदाधिकारी यादी तयार झाल्यानंतर आता प्रत्येकावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी एकेक प्रमुख तसेच २८८ विधानसभा क्षेत्रांसाठी एक पालक कार्यकर्ता नेमला जाईल. महाराष्ट्रातील किमान २०० जागांवर सहकारी शिवसेनेसह जिंकून येण्याचा प्रयत्न असेल. विधानसभेच्या निवडणुकीला वेळ आहे. त्या पूर्वी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत किमान ४५ जागा जिंकण्याची तयारी सुरू केल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

मोदी सरकारच्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त ४८ लोकसभा मतदारसंघात या सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेल्या प्रकल्पांची तेथील खासदार नागरिकांना
माहिती देईल. त्या त्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी स्वत: हजर राहील. जेथे भाजप किंवा मित्रपक्षाचा खासदार नाही तेथे एका महत्त्वाच्या नेत्यावर ही जबाबदारी सोपवली जाणार आहे. या संपर्क मोहिमेचे प्रमुख माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. खासदार, आमदार तसेच पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या कामाची आखणी सोपवण्यात आली आहे.

खासदारकीला ज्येष्ठ चेहरे
निवडणुकीच्या रणनीतीअंतर्गत महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा विचार आहे. दिल्लीच्या राजकारणात सक्रीय झालेले विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन अशा ज्येष्ठांना आता दिल्लीत कारभार करा, असे सुचवण्यात येणार आहे. याबाबत बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, की ‘अशा प्रकारचा कोणताही विचार सध्याच झालेला नाही. निवडून येण्याची क्षमता असलेले अनेक कार्यकर्ते आमच्याकडे आहेत. पक्षाने आदेश दिल्यावर भाजपचा कार्यकर्ता निवडणूक लढतो आणि जिंकतोही’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com