कारगिल कोंडातील ५७८ झोपड्या हटवल्या

कारगिल कोंडातील ५७८ झोपड्या हटवल्या

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २६ : पावसाळ्याच्या काळात डोंगर खचून अथवा दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटनेत निरपराध नागरिकांचा बळी जाऊ नये, यासाठी ठाणे वन विभाग सतर्क झाला आहे. मागील सात ते आठ दिवसांपूर्वी कारगिल कोंडा येथील ४७५ अतिक्रमणांवर कारवाई करत, ६.५ हेक्टर भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे. असे असताना, गुरुवारी (ता. २५) पुन्हा या ठिकाणी कारवाईची बडगा उगारत ५७८ अतिक्रमणांवर कारवाई करत, ४.७१० हेक्टर वनजमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली असल्याची माहिती वन विभागाने दिली. तसेच डोंगर उतारावरील अतिक्रमणांवरील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेदेखील वन विभागाने स्पष्ट केले आहे.

ठाणे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या जागेत बेकायदा अतिक्रमण करून राहणाऱ्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार १६ आणि १७ मे या दोन दिवसांत ४७५ अनधिकृत झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करत ६.५ हेक्टर वन जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली होती. गुरुवारी (ता. २५) पुन्हा याच भागातील अनधिकृतपणे नव्याने उभ्या राहणाऱ्या अतिक्रमणांच्या विरोधात पुन्हा कारवाईची बडगा उगारण्यात आला. या वेळी सहायक वन संरक्षक हिरीजा देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश देसले, वनपाल सचिन सुर्वे, वनरक्षक अनिल भामरे तसेच ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागासह पोलिस प्रशासन यांच्या उपस्थितीत ५७८ अनधिकृत झोपड्यांवर वन विभागाच्या माध्यमातून बुलडोझर चालवण्यात आला. यामध्ये ४.७१० हेक्टर वनजमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे. यापुढे वन विभागाच्या जागेत उभ्या राहणाऱ्या अतिक्रमणांना वीज जोडणी देऊ नये, यासाठी टोरंट कंपनीला, तर नळ जोडणी देण्यात येऊ नये याकरिता ठाणे पालिकेला पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती वन विभागाने दिली.

...............
कळवा, कारगिल कोंडा या वन परिक्षेत्रातील काही भागात तीव्र उतारावर धोकादायक झोपड्या हटवण्याची कारवाई पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार आहे. तसेच वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करणे कायद्याने गुन्हा आहे. गुरुवारीदेखील या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये, याकरिता दिवस व रात्र अशा दोन्ही वेळी गस्त घालण्यात येणार आहे.
- दिनेश देसले, वनक्षेत्रपाल अधिकारी, ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com