
वसईत तरुणाचा निर्घृनपणे खून
नालासोपारा, ता. २६ (बातमीदार) : सोबत काम करणाऱ्या महिलेला शिवीगाळ केल्याच्या रागातून दोघा बाप-लेकांनी २१ वर्षीय तरुणाचा कैचीने वार करून खून केला. याबाबत वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. किरकोळ कारणावरून एका तरुणाचा खून झाल्याने परिसरात आरोपींविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अंकित रामप्रकाश शहा (वय २१) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव; तर इमामुद्दीन मोहम्मद रफिक मन्सुरी, नईम इमामुद्दीन मन्सुरी असे हत्या करणाऱ्या बाप-लेकांची नावे आहेत. आरोपी आणि मयत हे तिघेही वसई पूर्व वाघराळपाडा येथील राहणारे आहेत. वाघराळपाडा येथील विशाल उपाध्याय चाळीकडे जाणाऱ्या रस्त्याकडील पिंपळाच्या झाडाजवळ गुरुवारी (ता. २५) रात्री साडेअकरा वाजता अंकितने महिलेला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून पहिल्यांदा वादविवाद सुरू झाला. याच वादात आरोपींनी आपल्याकडील कैचीने अंकितच्या छातीवर, दंडावर, पाठीवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. यातच अंकित याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर वालीवचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलाश बर्वे यांनी तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार करून अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. या आरोपींविरोधात शुक्रवारी पहाटे ५ वाजता वालीव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.