बाधितांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन

बाधितांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन

कल्याण, ता. २६ (बातमीदार) : कल्याण पूर्वमधील यूटाईप रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांचे आहे तेथेच पुनर्वसन करण्यात येईल. सोबत आजूबाजूच्या परिसराचा क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून विकास करू, अशी माहिती केडीएमसी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
कल्याण पूर्वमधील यूटाईप रस्ता आणि त्या परिसरात घनदाट लोकवस्ती आहे. त्या परिसरामधील रस्ते अरुंद पडत असून सकाळ-संध्याकाळी वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. कल्याण पूर्वमधील यूटाईप रस्ता रुंदीकरण करण्याच्या मागणीला जोर धरू लागल्याने पालिकेने रस्ता रुंदीकरणाबाबत नोटिफिकेशन काढल्यानंतर या कामाला पाठिंबा आणि विरोधही होत आहे. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली.
कल्याण पूर्वमधील लोकवस्ती घनदाट असून तेथील यूटाईप रस्ता अडीच किलोमीटरचा आहे. तो काही ठिकाणी नऊ मीटर, १२ मीटर, काही ठिकाणी १५ मीटरचा असल्याने तेथे नेहमी अडथळा असतो. सकाळ-संध्याकाळी वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांना चालणे मुश्किल होते. यासाठी सरसकट २४ मीटर रुंदीचा रस्ता करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या शिवाय त्या भागाचा विकास होणार नाही, असे मत पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी व्यक्त केले.

-------------
बायोमेट्रिक सर्व्हे करणार
रस्ता रुंदीकरणामध्ये १ हजार ४०० कुटुंबे बाधित होणार आहेत. त्यात ९०० व्यावसायिक गाळे असून ५०० राहती घरे आहेत. नागरिकांचे आहे तेथेच पुनर्वसन व्हावे, अशी बाधित नागरिकांची मागणी आहे. बधितांचे आहे तेथेच पुनर्वसन करण्याचा प्रयत्न असून, त्यानुसार बायोमेट्रिक सर्व्हे करण्यात येणार आहे. सोमवार (ता. २९) पासून प्रत्येक बधिताला नोटीस देण्यात येणार असून त्याची हरकत आणि सुनावणी घेण्यात येणार आहे. बधितांचे अहवाल शासनाकडे पाठवून त्याची मंजुरी मिळताच रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com