
विदेशी सिगारेट विकणाऱ्यांवर कारवाई
नवी मुंबई (वार्ताहर) : छुप्या पद्धतीने विदेशी सिगारेटची विक्री करणाऱ्या दोन पान शॉपवर वाशी पोलिसांनी बुधवारी रात्री छापे मारले होते. या कारवाईत गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे.
वाशी रेल्वे स्टेशनलगतच्या पॉन शॉपमध्ये विदेशी सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाशी रेल्वे स्टेशनसमोरील सफायर पान शॉपवर छापा मारला होता. त्यात हजारो रुपये किमतीचा विदेशी सिगारेटचा साठा असल्याचे आढळून आले होते. या वेळी पोलिसांनी सफायर पान शॉपचा मालक मोहम्मद रझी खान (३४) याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी रात्री सव्वाअकराच्या सुमारास वाशी सेक्टर-३० मधील सिडको पार्किंगसमोरील अण्णा पान शॉपवर छापा मारून त्याची तपासणी केली. या वेळी पान शॉपमध्येदेखील हजारो रुपये किमतीचा विदेशी सिगारेटचा साठा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी अरुणाचलम लक्ष्मणन (५४) याला ताब्यात घेतले. त्यामुळे या दोन्ही पान शॉपच्या मालकांनी केंद्र शासनाच्या अटींचा भंग केल्याने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातीत, वाणिज्य व्यापार निर्मिती, पुरवठा व वितरण अधिनियम, २००३ कलम ७ (३), २० (२) या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.