उन्हामुळे भाज्यांकडे ग्राहकांची पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उन्हामुळे भाज्यांकडे ग्राहकांची पाठ
उन्हामुळे भाज्यांकडे ग्राहकांची पाठ

उन्हामुळे भाज्यांकडे ग्राहकांची पाठ

sakal_logo
By

तुर्भे, बातमीदार

उन्हाळ्यात बाजारात भाज्यांची आवक कमी असते. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढलेले पाहायला मिळतात. मात्र, या वर्षी उन्हाळा सरत आला तरी बाजारात भाजीपाल्याची आवक नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले असले तरी स्वस्त दरातील भाजीपाला घेण्यासाठी ग्राहकच नसल्याने बाजारात भाज्यांची विक्रीच होत नसल्याचे दिसत आहे.
------------------------------------------
उन्हाळी सुट्ट्यांसाठी बहुतांश मुंबईकर गावी गेले आहेत, तर काही जण फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत. त्यामुळे मालाला बाजारात ग्राहक मिळत नाही. परिणामी ऐन उन्हाळ्यात बाजारात भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. जून महिन्यापर्यंत ही परिस्थिती अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज भाजीपाला व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून नवी मुंबई, मुंबई आणि इतर उपनगरे यांना भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी बाजारात सहाशे किंवा साडेसहाशे गाड्यांची आवक होत असते. मात्र, सध्या वाशीच्या घाऊक भाजीपाला बाजारातही आवक ४०० आणि ४५० गाड्यांवर आली आहे. त्यामानाने आवक कमीच आहे. मात्र, इतक्या कमी प्रमाणात आलेला मालही संपत नसल्याची परिस्थिती बाजारात आहे.
---------------------------------------------------
- गेल्या काही वर्षांपासून काही भाजीपाल्याच्या गाड्या बाजारात न येताच थेट मुंबई बाजारात जात आहेत. त्यामुळे मुंबईतील ग्राहक नवी मुंबईत खरेदीसाठी येत नाहीत. आधीच हा ग्राहक वर्ग कमी झाला आहे. त्यात मुंबई, नवी मुंबईतील लोक बाहेरगावी गेल्याने त्यांच्याकडून होणारी भाजी खरेदी कमी झाली आहे.
- बाजारातून हॉटेल व्यावसायिकांकडून होणारी खरेदीही कमी झाली आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकवर्गाची संख्या रोडावली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून भाजीपाल्याची खरेदी कमी प्रमाणात होत आहे. एकंदरीत मालाला हवा तसा उठाव मिळत नसल्याने भाजीपाल्याचे भाव पडले आहेत.
- वातावरणात उष्णता जास्त असल्याने हा माल साठवून ठेवता येत नाही. परिणामी, व्यापाऱ्यांच्या गाळ्यांवर येणारा भाजीपालाही मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. उन्हामुळे माल पडून राहत असल्याने दोन दिवसांनंतर हा माल कचऱ्यात फेकून द्यावा लागत आहे.
----------------------------------------
‘या’ भाज्यांची विक्रमी घसरण
घाऊक बाजारात मे महिन्यात भाज्यांचे दर ६० ते ८० रुपये किलो असतात. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्या ८० ते १०० रुपये किलोच्या घरात असतात. घाऊक बाजारात मटार ३० ते ६० रुपये किलोने उपलब्ध आहे, तर शेवग्याची शेंग ४० ते ४५ रुपये किलो आहे. कोबी, फ्लॅावरला उठाव नसल्यामुळे दर ८ ते १० रुपये किलो आहेत, तर टोमॅटो ८ ते १० रुपये किलो, भोपळा ६ रुपये किलो आहे.
------------------------------------------------
भाजीपाल्याची आवक कमी आहे, पण त्याचबरोबर मालाला हवातसा उठाव मिळत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारात माल पडून आहे. परिणामी, दरररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला कचऱ्यात जात आहे.
- के. बी. सावळकर, प्रभारी उपसचिव, भाजीपाला बाजार
------------------------------------------
भाजीपाल्याचे दर घाऊक बाजारात
प्रकार सध्याची किमत (रुपयांमध्ये)
भेंडी २५ ते ३०
दुधी भोपळा २०
चवळी शेंग २०
फरसबी ४०
गाजर २०
घेवडा ३५
कारली २०
ढोबळी मिरची २०
शिराळी दोडकी ३० ते ३५
सुरण ३० ते ४०
वांगी २० ते ३०
हिरवी मिरची २८ ते ४०

------------------------------------