पावसाच्या आगमनाचे संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाच्या आगमनाचे संकेत
पावसाच्या आगमनाचे संकेत

पावसाच्या आगमनाचे संकेत

sakal_logo
By

अजित शेडगे, माणगाव
वैशाख महिना संपून ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झाली आहे. यंदा अतिउष्ण अशा उन्हाच्या झळांनी माणसांबरोबरच पशु-पक्षीही बेजार झाले आहेत. ज्येष्ठ महिन्याच्या आगमनाबरोबर पावसाळ्‌याची चाहूल लागते. साधारणपणे वैशाख महिन्यातच पावसाच्या आगमनाचे संकेत मिळतात. हवामान खात्याने, यंदा पावसाळा सर्वसाधारण राहील, असे भाकीत केले आहे. मात्र येणाऱ्या पावसाळ्याचे संकेत निसर्ग देत असून वैशाखाच्या रणरणत्या उन्हात व ज्‍येष्ठाच्या आगमनात पावसाची आतुरता वाढली आहे.
माळरानावर झाडाझुडपांमध्ये हिरवी पानगळ सुरू झाली आहे. विविध प्रकारच्या रानभाज्या उगवण्यास सुरुवात झाली असून बांबूच्या बेटांमध्ये घरटी तयार करण्यात पक्ष्यांची लगबग सुरू आहे.
पावसाळ्यापूर्वी कावळा, चिमणी, भारद्वाज व इतर पक्ष घरटी बांधतात. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, अनेक पक्षी पावसाळ्याच्या संकेतानुसार, आपापली घरटी कमी जास्त उंचीवर बांधतात. या वर्षी अनेक पक्षांनी आपली घरटी मध्यम उंचीवर बांधल्‍याचे दिसून येत आहे. रानकोंबडी व इतर पक्षांनी आपापली घरटी बांधून अंडीही घातली आहेत.
शेवला, कुडा यांसारख्या रानभाज्या पावसाळा सुरू होण्यापूर्वी दहा ते पंधरा दिवस आधी उगवतात. येतात. सध्या या रानभाज्या उगवल्या असून पावसाचे संकेत मिळत आहेत. पावसाळ्याच्या आगमनापूर्वी कोकीळ मोठ्या आवाजात ओरडतो. कोकीळचा आवाज हे पावसाच्या आगमनाचे चिन्ह मानले जाते. कोकिळ सुमधून ओरड सर्वत्र ऐकू येत असल्‍याने पावसाळा जवळ आल्याचे जाणकार सांगतात. दिवसभर हवामानात बदल होत असून सकाळी पावसाचा शिडकाव, दुपारी कडक ऊन तर सायंकाळी ढगाळ हवामानाचा अनुभव सध्या येत आहे. पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनीही मशागतीची कामे सुरू केली असून बांधबंदिस्तीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होण्याचे संकेत मिळत असल्‍याने शेतकऱ्यांसह पशुपक्षीही कामाला लागले आहेत. पावसाचे संकेत निसर्गमित्र, जाणकार, पक्षी, विविध कीटक व शेतकऱ्यांना मिळत असून पावसाचा सांगावा आल्याने पावसाच्या स्वागताची तयारी शेतकरी, पशुपक्षी करत आहेत

पावसाळा सुरू होण्यापूर्वी विविध पक्षी आपापली घरटी बांधतात. यंदाही पक्षांनी घरटी बांधण्यास सुरुवात केली असून काही पक्ष्यांनी मध्यम उंचीवर घरटी बांधलेली दिसतात. त्‍यामुळे यंदा सर्वसाधारण पाऊस पडण्याचे संकेत मिळत आहेत.
- विलास देगावकर, पक्षी निरीक्षक