
पालिकेचा इको इंडियासह संयुक्त मोहीमेसाठी पुढाकार
थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार
पालिकेचा इको इंडियासह संयुक्त मोहिमेसाठी पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळणार आहेत. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि कौशल्यविकास याला प्राधान्य दिले जाणार आहे. मुंबई महापालिकेने यासाठी इको इंडिया सोबत संयुक्त मोहिमेसाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इको इंडिया (एक्स्टेंशन फॉर कम्युनिटी हेल्थकेअर आऊटकम) यांच्या संयुक्त विद्यमानाने थॅलेसेमिया नियंत्रण आणि हेमोग्लोबिनोपॅथी नियंत्रणासाठी ही मोहीम सुरू केली आहे.
रक्ताशी संबंधित दुर्मिळ आजाराने ग्रस्त रुग्णांची योग्य काळजी घेता यावी, यासह व्यापक जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर हा पुढाकार घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेचे बोरिवलीतील थॅलेसेमिया उपचार केंद्र हे या मोहिमेसाठी माहिती केंद्र म्हणून कार्यरत आहे. शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी इको इंडिया यांनी संयुक्त सहभाग घेतला असून शीव रुग्णालयाचे दूरस्थ (सॅटेलाईट) केंद्र असलेली प्रादेशिक प्रशिक्षण संस्था (बोरिवली) ही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
महत्त्वाचे पाऊल
पेडिएट्रिक हेमॅटोलॉजी ऑन्कॉलॉजी ॲण्ड बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्राच्या संचालक डॉ. ममता मंगलानी म्हणाल्या की, मुंबईतील थॅलेसेमिया रुग्णांच्या नियमित तपासणीचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. तसेच, हिमोग्लोबिनोपॅथीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्या दिशेने इको इंडियासोबतची भागीदारी ही रक्ताशी संबंधित दुर्मिळ आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी उपचार उपलब्धततेसाठी महत्त्वाचे पाऊल आहे.
आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी वर्गाची क्षमता, ज्ञान, कौशल्य विकासवाढीसाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण मोहिमेमुळे मुंबईतील थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची काळजी अधिक चांगल्या रीतीने घेणे शक्य होणार आहे. त्यासोबतच रुग्णांना प्राथमिक टप्प्यातच योग्य उपचार मिळतानाच गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होईल. थॅलेसेमिया तसेच रक्ताशी संबंधित दुर्मिळ आजारांनी ग्रस्त रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांमधील पोकळी भरून काढण्यासाठी ही मोहीम उपयुक्त असेल.
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका
अनुवांशिक रक्ताच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना उपचार देण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण, योग्य ज्ञान आणि आवश्यक कौशल्याच्या प्रशिक्षणामुळे रुग्णांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
- डॉ. उपेंद्र किंजवडेकर, अध्यक्ष, इंडियन अकॅडमी ऑफ पेडिएट्रिक्स
महापालिकेसोबत इको इंडियाची भागीदारी ही प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने थॅलेसेमिया आणि हेमोग्लोबिनोपॅथीज संसर्ग प्रतिबंध, नियंत्रण आणि रुग्णांना प्रतीकारक क्षमता वाढीसाठी चालना देणार आहे.
- डॉ. संदीप भल्ला, सहउपाध्यक्ष, इको इंडिया