
अपघातात जखमी तरुणाला जीवदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : रस्ते अपघातात यकृतावर परिणाम झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यात त्याचे ६५ टक्के यकृत प्रभावित झाले होते. वेळीच उपचार झाल्यामुळे तरुणाचे प्राण वाचल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
वसईत राहणारा प्रज्वल हा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या पोटावरून कार गेली होती. त्यामुळे तो जागीच बेशुद्ध पडला होता. रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याचा रक्तदाब खूपच कमी होता. वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या यकृताला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले. यकृताला इजा झाल्याने रक्तस्रावही सुरू झाला होता. रक्तस्राव आटोक्यात आणण्यासाठी त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी यकृताचे सीटी स्कॅन करण्यात आले होते. त्यात यकृताचा ६५ टक्के भाग खराब झाल्याचे आढळून आले होते. केवळ ३५ टक्के यकृत कार्यक्षम होते. तातडीची शस्त्रक्रिया केल्यामुळे तरुणाचे प्राण वाचले, असे डॉ. इम्रान शेख यांनी सांगितले. सध्या तरुणाची प्रकृती सुधारत आहे.