शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची हत्या
शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची हत्या

शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची हत्या

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २७ (वार्ताहर) ः पूर्ववैमनस्यातून सहा जणांच्या टोळक्याने मटक्याच्या धंद्यावर चाल करून शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख शब्बीर शेख यांची शस्त्रांचे वार करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. २६) रात्री उल्हासनगरातील हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांची दोन पथके त्यांच्या अटकेसाठी रवाना झाली आहेत. हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
शब्बीर शेख यांचा उल्हासनगर कॅम्प ५ च्या जय जनता कॉलनीमध्ये मटक्याचा धंदा चालायचा. १५ दिवसांपूर्वी शब्बीर यांच्या सहकाऱ्यांनी विक्रम कवठणकर याला मारहाण केल्याचा आरोप होता. याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्याच रागातून विक्रम याने मित्रांच्या मदतीने काल रात्री पावणेबाराच्या सुमारास शब्बीर यांच्या मटक्याच्या धंद्यावर चाल केली. शब्बीर यांनी पळण्याचा प्रयत्न केला; परंतु हल्लेखोरांनी सुऱ्याने त्यांच्यावर जवळपास ४० पेक्षा अधिक वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शब्बीर यांना प्रथम उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात आणि तेथून फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; परंतु फोर्टिसच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सहा जणांवर गुन्हा
घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू जप्त केले आहेत. याप्रकरणी विक्रम कवठणकर, जयेश साळुंके आणि विजय रूपानी यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी उल्हासनगर गुन्हे शाखा आणि हिललाईन पोलिस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे.