
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भिवंडी, ता. २७ (बातमीदार) : टेम्पो आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा टेम्पोच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २६) सायंकाळच्या सुमारास अंजूरफाटा येथे घडली आहे. हरीश विनोद सुरवाडे (वय २४) असे अपघातात मृत झालेल्या पतीचे नाव असून कंचन सुरवाडे (वय २१) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. अपघातग्रस्त पत्नीच्या फिर्यादीवरून नारपोली पोलिस ठाण्यात टेम्पोचालक हसीब रईस हुसेन शेख (वय १९) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त दाम्पत्य काल्हेर पाईपलाईन येथील रहिवासी आहेत. दरम्यान, हे दाम्पत्य शुक्रवारी खरेदीसाठी दुचाकीवरून काल्हेरहून अंजूरफाट्याकडे येत होते. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोचा चालक हसीबने दुचाकीला उजव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता टेम्पोची दुचाकीला धडक बसल्याने अपघात झाला. त्यावेळी दुचाकीस्वार टेम्पोखाली येऊन टेम्पोचे डाव्या बाजूकडील चाक हरीशच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात त्याची पत्नी कंचनच्या डोक्याला, खांद्याला व पायाला मुका मार लागून ती गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हरीशचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवला आहे. त्याची पत्नी कंचनच्या फिर्यादीवरून टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एस. शिरसाट करत आहेत.