
शस्त्रे घेऊन आलेल्या दोन तरुणांना अटक
अंधेरी, ता. २७ (बातमीदार) : घातक शस्त्रे घेऊन आलेल्या दोन तरुणांना वांद्रे बीकेसी परिसरातून गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी एक महागडी कार, दोन देशी-विदेशी पिस्तूल, मॅगझीन आणि जिवंत काडतुसे असा साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शमीम नैमुद्दीन अहमद ऊर्फ अच्छे आणि नूरआलम सगीर अहमद ऊर्फ तैमूर अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
वांद्रे परिसरात काही तरुण घातक शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती मालमत्ता कक्षाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार पथकाने बीकेसी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवारी (ता. २६) रात्री साडेनऊला एका कारमधून दोन तरुण आले. या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी कारची झडती घेतली. यात शस्त्रे सापडली. तपासात शमीम आणि नूरआलम हे दोघेही कुर्ला येथील कफपरेडच्या गणेशमूर्ती नगरात राहत असून चालक म्हणून काम करतात. जप्त केलेली कार एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकीची आहे.