एपीएमसीतील व्यापाऱ्यांना २० कोटींचा गंडा

एपीएमसीतील व्यापाऱ्यांना २० कोटींचा गंडा

नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : कडधान्ये तसेच इतर कृषी मालाच्या खरेदी-विक्रीतून एका ठकसेनाने एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांना २० कोटींपेक्षा अधिकचा गंडा घातला आहे. या प्रकरणी निशीत बजोरिया याच्यासह त्याच्या पत्नीविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल असून मुंबईसह महाराष्ट्रातील काही व्यापाऱ्यांची त्याने अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे.
मुंबईतील मे. पोद्दार ग्लोबल प्रा.लि. कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या निशीत बजोरिया हा कडधान्ये व इतर कृषी मालाच्या खरेदी विक्रीचे काम करत होता. २०२१ पासून एपीएमसी मार्केटमधील शुभमंगल कमोडिटीस या फर्मसोबत त्याने व्यापार सुरू केला होता. दरम्यान, निशीत बजोरिया याने संधी साधत स्वत:ची मे. परफेक्सो इनोव्हेशन्स प्रा. लि. ही कंपनी मे.पोद्दार ग्लोबल कंपनीशी संलग्न कंपनी असल्याचे भासवले होते. त्यानंतर त्याने या कंपनीच्या माध्यमातून एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांसोबत कडधान्याचा कोट्यवधी रुपयांचा परस्पर व्यवहार सुरू केला होता. मात्र, व्यापाऱ्यांना माल देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांचे पैसे थकवून त्याने पलायन केले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
-------------------------------------------------------
अकोला, औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल
ठकसेन निशीत याने मे. पोद्दार ग्लोबल प्रा.लि. कंपनीत गैरव्यवहार केल्याने त्याच्याविरोधात मुंबईतील एमआरए मार्ग तसेच खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच निशीत याने अकोला येथील कुशल अगरवाल यांची देखील ८.५६ कोटींची फसवणूक केली असल्याने अकोला येथील रामदास पेठे पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हादाखल आहे. तसेच औरंगाबाद येथील मनीषकुमार चेचानी यांचीदेखील ३.३९ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याने आणखी काही व्यापाऱ्यांची फसवणूक झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com