
ताराबंदर कांदळवनाच्या चौकशीसाठी समिती
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २९ : मुरूड तालुक्यामधील कोलमांडले येथील खारफुटीच्या झाडांची नासाडी करणारे आणि वनजमिनीवर अतिक्रमण करणार्या समाजकंटकांविरोधात अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असा तक्रार अर्ज प्राप्त झाल्याने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने अर्जदार प्रतीक प्रमोद कांगी यांच्या तक्रार अर्जानुसार चौकशी समिती गठित करण्याचे आदेश दिले.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी रायगड, महाराष्ट्र राज्य किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा वन अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत. ही संयुक्त समिती साइटला भेट देईल, संबंधित माहिती संकलित करेल आणि पर्यावरणीय कायदे आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास, दोन महिन्यांच्या आत कायद्यानुसार योग्य उपाययोजना करेल. या आदेशाचे समन्वय आणि पालन करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी, रायगड हे नोडल एजन्सी असतील. कारवाई केलेल्या अहवालाची प्रत संयुक्त समितीने या राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाच्या रजिस्ट्रारसमोर दाखल केली करावी तसेच पुढील आदेशासाठी आवश्यक वाटल्यास खंडपीठासमोर प्रकरण मांडावे असेही आदेशात नमूद करण्यांत आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात जिल्हा प्रशासनाला कारवाई करून कारवाईचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर करणे बंधनकारक झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रतीक प्रमोद कांगी यांनी या प्रकरणात गेली दोन वर्षे पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
****
काय आहे प्रकरण काय
काही व्यक्तींनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर कांदळवनात माती, दगड, मुरूम इ.चा बेकायदेशीरपणे भराव टाकून कांदळवनाच्या झाडांची कत्तल करित असल्याच्या तक्रारी पोलिस प्रशासन, महसूल विभाग, वन विभाग, कांदळवन कक्ष व जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे करण्यांत आल्या होत्या. अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. समुद्राला येऊन मिळणाऱ्या खाड्या बुजविण्याचे काम राजरोसपणे सुरू असूनही प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजीची भावना निर्माण झाली होती.
****