
तारपा नृत्याची खिल्ली उडवल्याप्रकरणी निषेध
कासा, ता. २८ (बातमीदार) : आदिवासी बांधवांच्या तारपा नृत्याची एका दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात खिल्ली उडवल्याचा आरोप करत आदिवासी संघटनांनी संबंधित मालिकेतील कलाकारांचा निषेध व्यक्त केला.
दूरचित्रवाणीवरील मालिकेमधील एका कलाकाराने एका भागात तारपा हे आदिवासी समाजातील पारंपरिक नृत्य करून दाखवले होते. या वेळी त्याने तारपा नृत्याची खिल्ली उडवली आहे, असे आदिवासी भूमिसेना संघटनेचे पदाधिकारी भरत वायडा यांनी सांगत या घटनेचा निषेध व्यक्त केला. या भागात त्याने माकडउड्या मारत वेडेवाकडे तारपा नृत्य केले आणि त्या वेळी तेथील परीक्षक मोठ्याने हसून दाद देत आहेत, असा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे आदिवासी समाजाची अस्मिता असणाऱ्या तारपा नृत्याची खिल्ली उडवल्याने हा अपमान आहे. यामुळे आदिवासी समाज आणि कलाकारांनी एकत्र येत संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवारी (ता. ३०) डहाणू तालुक्यातील चारोटी नाका येथे एकत्र येत निषेध करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच संबंधित वाहिनीने माफी मागावी, अशी मागणी केली जाणार आहे.