क्लस्टर इमारतीच्या पायाभरणीला मुहूर्त

क्लस्टर इमारतीच्या पायाभरणीला मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : तब्बल दहा वर्षे केवळ चर्चेचे आणि कार्यवाहीचे गुऱ्‍हाळ सुरू असलेल्या बहुप्रतीक्षित ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला अखेर मूर्तरूप मिळण्याची घटिका समीप आली आहे. सरकारी आणि सुविधा भूखंड अशा सुमारे चाळीस हजार चौरस मीटर भूखंडावर नवी वसाहत बांधण्यात येणार आहे. या भूखंडावर इमारती बांधून झाल्यावर लाभार्थ्यांना थेट चाव्या देण्याची योजना आहे. या पहिल्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये किसननगरचे रहिवासी असून त्यांच्यासाठी क्लस्टर इमारतीच्या पायाभरणीच्या भूमिपूजनाचा मुहूर्त जूनच्या पहिल्या आठवड्यात निश्चित करण्यात आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारत दुर्घटनेच्या मालिका लक्षात घेता २०१३ मध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करण्यात आली. त्यामुळे धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहणाऱ्‍या नागरिकांना दिलासा मिळाला; पण ही योजना या ना त्या कारणामुळे गेली दहा वर्षे रेंगाळत होती. धोकादायक इमारतींमधील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी ठाणे महाापलिका प्रशासनाने ४६ यूआरपी तयार केल्या. त्यामध्ये किसननगर, हाजुरी, राबोडी, लोकमान्यनगर, टेकडी बंगला आणि कोपरी या यूपीआरला पहिली मंजुरी मिळाली आहे. या भागातील नागरिकांचे सर्वेक्षणदेखील करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या किसननगर येथे क्लस्टर डेव्हल्पमेंटचे भूमिपूजनही काही वर्षांपूर्वी झाले; पण हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी खासगी विकसक पुढे येत नसल्याने अखेर पालिकेने सिडकोची मदत घेतली आहे.
सिडकोसोबत महापालिकेने सामंजस्य करार केल्यानंतरही हा प्रकल्प संक्रमण शिबिरांमुळे रखडत असल्याचे पुन्हा लक्षात आले. संक्रमण शिबिरे बांधून रहिवाशांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आणखी कालावधी जाणार, हे निश्चित झाल्यानंतर त्यावर तोडगा म्हणून रहिवासी इमारती खाली न करता आधी त्यांच्यासाठी भूखंड निश्चित करून वसाहत उभारण्याचे ठरवण्यात आले. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्‍याने दिलेल्या माहितीनुसार ठरल्याप्रमाणे किसननगरसाठी ही पहिली योजना राबवण्यात येणार असल्याने या परिसरालगत असलेल्या मुंबई महपालिकेचा ७७ गुंठे भूखंड हस्तांतरित करून घेण्यात आला आहे. तसेच दोस्तीचा अडीच एकरचा सुविधा भुखंडही ताब्यात आला आहे. प्रत्येक भूखंडावर २० हजार चौरस मीटर म्हणजे प्रत्येक भूखंडावर सुमारे ४ लाख चौरस फुटाचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

टॉवरमधील प्लॅटच्या थेट चाव्या
विकसित केलेल्या भूखंडावर टोलजंगी टॉवर उभारण्यात येणार आहेत. या प्लॅटच्या थेट चाव्या क्लस्टरच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. या विकसित भूखंडावर टाऊनशिपप्रमाणे शाळा, रुग्णालये, उद्याने इत्यादी सुविधा असणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्यांना सध्या ते राहत असलेले घर सोडण्याची गरज भासणार नाही; तर येत्या काही वर्षांमध्ये थेट नवीन घरातच गृहप्रवेश मिळणार आहे. याचे मानकरी पहिले किसनसनगरवासीय ठरणार आहेत.

हाजुरीचा प्रकल्पही राबवणार
पहिल्या प्रकल्पामध्ये किसनगरचा पुनर्विकास केल्यानंतरही अनेक इमारती उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तेथे मग हाजुरी परिसरात क्लस्टर राबवण्याचा मानस असल्याची महिती पालिका अधिकाऱ्‍यांनी दिली.

भूमिपूजनानंतर तातडीने काम सुरू
भूमिपूजनाची तात्पुरती तारीख निश्चित करण्यात आली आहे; मात्र ती अद्याप जाहीर करण्यास सूत्रांनी नकार दिला असला, तरी हा मुहूर्त जूनच्या पहिल्याच आठवड्यात असणार आहे. त्यानंतर तातडीने प्रत्यक्ष इमारत उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com