चार वीरांचे एव्हरेस्ट शिखर सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार वीरांचे एव्हरेस्ट शिखर सर
चार वीरांचे एव्हरेस्ट शिखर सर

चार वीरांचे एव्हरेस्ट शिखर सर

sakal_logo
By

मोहिनी दशरथ जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २८ : जगातील सर्वांत उंच एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम बदलपूरच्या हेमंत जाधव यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी केला आहे. एव्हरेस्ट मोहिमेत जाधव यांच्यासोबत त्यांचे तीन सहकारी सहभागी झाले होते. या चौघांनी एव्हरेस्ट शिखर सर करत बदलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
हेमंत जाधव हे शहापूर तालुक्यातील मुळचे खर्डी येथील रहिवासी असून, सध्या ते बदलापुरात राहतात. संतोष दगडे, धनाजी जाधव, संदीप मोकाशी यांच्यासोबत एव्हरेस्ट चढाईत सहभागी झालेले हेमंत जाधव टीमलीडर होते. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागात कार्यालय अधीक्षक म्हणून ते काम करतात. ट्रेकिंग करण्याची हौस असल्याने एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी प्रचंड मेहनत करायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी बदलापूरपासून पाच ते सहा किमी अंतरावर असणाऱ्या हाजीमलंग डोंगराची न चुकता चढाई करण्याचा सराव सुरू केला. सुरुवातीला पाठीवर २५ किलोचे वजन घेऊन डोंगर सर करण्यास त्यांना तीन तास लागत होते. अखेर सात महिन्यांनी पाठीवरील वजनासह त्यांनी हा डोंगर एक तास ३५ मिनिटांत चढून पूर्ण केला. मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने त्यांना एव्हरेस्ट चढाईसाठी २५ ते ३० लाख खर्च कसा उभा करायचा हा प्रश्न होता. यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासन, मित्र परिवार यांच्याकडील मदत आणि बँकेतून कर्ज काढले. त्यानंतर १२ एप्रिलला तिन्ही मित्रांसह त्यांनी एव्हरेस्ट मोहिमेला कूच केली.

खराब हवामानाचा परिणाम
या वर्षी प्रचंड खराब हवामानामुळे माऊंट एव्हरेस्टचा समिट रूट १५ दिवस उशिरा सुरू झाला. १२ एप्रिल ते १२ मे या एक महिन्याच्या कालावधीत तेथील वातावरणाशी जुळवून घेणे, बेस कॅम्प ते कॅम्प चार अशी मजल दरमजल असा सरावाचा टप्पा सुरू झाला. महिनाभराच्या सरावानंतर निर्णायक मोहीम फत्ते करण्यासाठी हेमंत जाधव आणि त्यांची टीम सदीप मोकाशी, संतोष दगडे व धनाजी जाधव जिला डेथ झोन कॅम्प चारवर पोहचले. त्यानंतर एव्हरेस्टच्या समिटच्या मार्गात प्राणवायूचा अपुरा पुरवठा व प्रतिकूल परिस्थिती पाहता, त्याच्या टीममधील फक्त एकालाच एव्हरेस्टचे समिट गाठण्यासाठी जाता येईल असे सांगण्यात आले. या वेळी टीम लीडर म्हणून हेमंत जाधव यांनी कर्जत येथील रहिवासी संतोष दगडे यांना ती संधी दिली. शेवटी कॅम्प चारपासून ते समिट असे ८०० मीटरचे अंतर संतोष दगडे यांनी गाठले. नेपाळमध्ये वसलेल्या ८८४८ मीटर उंचीच्या माऊंट एव्हरेस्ट शिखरावर या टीमच्या वतीने संतोष दगडे यांनी १७ मे २०२३ रोजी मध्यरात्री १.५५ मिनिटाने भारताचा तिरंगा आणि रेल्वेचा झेंडा फडकावला.


एव्हरेस्ट चढाईत पश्चिम बंगालजवळील समुद्रात निर्माण झालेले वादळ आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेकांना आम्ही प्राण सोडताना पाहिले आहे. याही परिस्थितीत धीर न सोडता आपले ध्येय गाठण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यातून मिळालेले हे यश आहे. यात काठमांडू प्रशासन, भारतीय प्रशासन व्यवस्था, रेल्वे प्रशासन, मित्र परिवार, कुटुंबांचे मोलाचे सहकार्य होते. आमच्या चारही जणांच्या टीमचे हे एकत्रित महायश आहे. तरुणपणी पाहिलेले स्वप्न आता वयाची ५० शी ओलांडून पूर्ण झाल्याने खूप जास्त आनंद होत आहे.
- हेमंत जाधव, एव्हरेस्ट वीर, बदलापूर