
भिवंडीत युवाशक्ती करिअर मार्गदर्शन
भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : शहरातील भादवड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर शुक्रवार उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी शासनाच्या महापारेषण ठाणे विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र नागरे हे होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि दीपप्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समुपदेशक डॉ. दिनेश गुप्ता, भिवंडी मनपाच्या शिक्षण अधिकारी नेहाला मोमीन आदी उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता वाढून स्वतःला घडवावे त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक करियर निवडावे, असे आवाहन नागरे यांनी केले. तर डॉ. दिनेश गुप्ता यांनी युवकांना करिअर संदर्भात पंचसूत्री सांगितली. हा कार्यक्रम करण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवंडी येथील प्राचार्य श्रीमती सीमा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, गट निर्देशक आर. एम. परपटे यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.