शासकीय जमिनीवरील १३४ अतिक्रमणाना नोटिसा

शासकीय जमिनीवरील १३४ अतिक्रमणाना नोटिसा

खर्डी, ता. २९ (बातमीदार) : ग्रामीण भागात दिवसेंदिवस गावठाण जमिनीवर अतिक्रमण होण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशात मुंबई उच्च न्यायालयाने २२ ऑक्टोबर रोजी राज्यातील गुरुचरण जमिनीवरील सर्व अतिक्रमण निष्काषित करण्याचे आदेश दिल्याने, शहापूर तालुक्यातील गुरुचरण जागेवरील सुमारे १३४ अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अतिक्रमण करून राहणाऱ्या रहिवाशांनी ३० दिवसांत पुरावे म्हणून योग्य ते कागदपत्रे हजर करावीत अन्यथा या अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याचे नोटीसत नमूद करण्यात आले आहे.
शहापूर तालुक्यातील १३४ अतिक्रमणे हटविण्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पिढ्यानपिढ्या वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांनाही या नोटिसा आल्याने गोरगरीब आदिवासी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यात सर्वाधिक शासकीय जमीन खर्डी ग्रामपंचायत हद्दीत असून त्याअंतर्गत ३०० एकरच्या वर जमीन उपलब्ध आहे. परंतु त्यातील ५० एकरावरील शासकीय जागेवर ३६५ अतिक्रमणे झाली असल्याची नोंद खर्डी ग्रामपंचायतीमध्ये आहे. येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी वारंवार नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तर सद्या परिस्थितीत खर्डीत महसूल विभागाकडून ५५ अतिक्रमणाला नोटिसा बजाविण्यात आले असल्याचे खर्डीचे तलाठी विजय लोहकरे यांनी सांगितले आहे. तर येथील सरसकट अतिक्रमणे कायम करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नोटिसांची संख्या
खर्डी : ५५
वासिंद : ५०
शेंदरुन खु : १०
नडगाव : ६
ठिळे : ३
तुते : ३
इतर : ७
एकूण : १३४
----
खर्डी गावात हजारो अतिक्रमण असताना देखील, कोणत्याही प्रकारचा मोजणी सर्वे न करता मुठभर गोरगरीब जनतेवर महसूल विभागाने अतिक्रमण हटविण्यासाठी नोटिसा देऊन अन्याय केला आहे. सर्वच शासकीय जमिनीचा सर्वे करून अतिक्रमणाची हद्द निश्चित करूनच सर्व संबंधितांना नोटीस देण्यात याव्यात. व्यावसायिक अतिक्रमणांवर कार्यवाही करावी तसेच ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून शासकीय जमिनीमधील सर्व घरकुल योजना आणि अतिक्रमण यांची कसून चौकशी करावी.
- हेमंत परदेशी, अतिक्रमण नोटीस धारक, खर्डी
-------
शासकीय जागेवरील अतिक्रमण कुठल्याही शासकीय योजनेनुसार सुरक्षित होत असल्यास त्याची कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करावी. याबाबत आपले म्हणणे संबंधित तलाठ्याकडे द्यावे. पण योग्य ती कागदपत्रे हजर न केल्यास अतिक्रमण ६० दिवसानंतर काढण्यात येईल.
- अधिक पाटील, प्रभारी तहसीलदार, शहापूर
----
अतिक्रमणाला शासनच जबाबदार असून, या नोटिसांना आम्ही उत्तर देणार असून एकाही गोरगरिबांचे अतिक्रमण हटवू देणार नाही. यासाठी तीव्र आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. - प्रकाश खोडका, सचिव, श्रमजीवी संघटना, शहापूर तालुका
....
खर्डी : शासकीय जागेवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com