शेतकऱ्यांची रासायनिक खताकडे पाठ

शेतकऱ्यांची रासायनिक खताकडे पाठ

शेतकऱ्यांची रासायनिक खताकडे पाठ
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८ : रायगड जिल्हा हा सर्वाधिक रासायनिक खत निर्मिती करणारा जिल्हा आहे; मात्र, रासायनिक खताच्या वापरात शेवटच्या गटात जिल्ह्याचा समावेश होतो. २०१५ पर्यंत येथील शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर करून पिकाची उत्पादकता वाढवली, परंतु ही उत्पादकता आता खुंटली आहे. रासायनिक खताचा वापर वाढल्‍याने तोटे जास्त जाणवत असल्याने अखेर जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी चार वर्षात खताचा वापर कमी करण्यास सुरुवात केल्‍याचे कृषी विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.
रासायनिक खतामुळे जमिनीचे आरोग्य ढासळू लागल्याने येथील शेतकऱ्यांनी हा बदल केला असून जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. उत्‍पादनवाढीसाठी पिकाला रासायनिक खतांची गरजेपेक्षा अधिक मात्रा देतो. रासायनिक खताचा अधिक व सातत्‍याने वापर केल्‍यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. परिणामी जमिनीची उत्‍पादकता कमी होते. खतांचा वापर अधिक करावयाचा झाल्‍यास पिकांना पाणीही मोठया प्रमाणावर द्यावे लागते. जे सर्वच भागात शक्य नसते.
रायगड जिल्ह्यातील भातशेती मुख्यत्वे पावसाच्या पाण्यावर डोंगराळ भागात पिकवली जाते. तेथे पाण्याचे सातत्य कायम राहात नसल्याने खताच्या वापराचा योग्य तो परिणाम साधता येत नाही. साहजिकच त्‍यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. परिणामी जमीनी खारवटतात, असा अनुभव येथील शेतकऱ्यांना २०१५ पासून सातत्याने येऊ लागला आहे. त्याचबरोबर रासायनिक खतांप्रमाणे किटकनाशकांच्‍या वापराचेही अनिष्‍ट परिणाम होत दिसून आले आहे. यातूनच रासायनिक खताचा वापर टाळत काही प्रमाणात सेंद्रिय शेतीचा पर्याय येथील शेतकऱ्यांनी निवडला आहे. जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी सेंद्रिय, जैविक, ऑरगॅनिक शेती शिवाय पर्याय नाही, असे शेतकऱ्यांना जाणवू लागले आहे.


माती परीक्षणाचा फायदा
केंद्र सरकारने मृदा आरोग्य कार्डसारखी महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. आजही बहुतेक शेतकरी माती परीक्षण करीत नाहीत. पारंपरिक पद्धतीने रासायनिक खतांचा वापर करतात. आपल्या जमिनीत काय कमी आहे. याची माहिती घेऊन जे कमी आहे, त्याचाच वापर केला तर जमिनीचे आरोग्य चांगले राहील, शिवाय शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही कमी होणार आहे.

नॅनो युरियाचा पुरवठा
युरियाचा अतिरेकी वापर थांबविणे, आर्थिक बचत करणे आणि जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी नॅनो युरिया बाजारात आणला गेला आहे. नुकत्याच झालेल्या खरीप आढावा बैठकीत रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर या कंपनीकडून युरियाच्या एका गोणीबरोबर नॅनो युरिया खताच्या पिशवीचा पुरवठा करण्याची मागणी येथील लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यास आरसीएफ कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजे. व त्यासाठी कृषी विभागाने जनजागृती करावी, अशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या होत्या.


सेंद्रिय, जैविक खतांचा वापरास प्राधान्य
रासायनिक, विद्राव्य खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर करा, असे सर्वच पातळींवरून सांगितले जात असले तरीही गरजे इतकी सेंद्रिय खतांची उपलब्धता नाही, रायगड जिल्ह्यात सेंद्रिय खताचा पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यात काही शेतकरी यशस्वीही झाले आहेत. रायगड जिल्ह्यातून पांढरा कांदा, हापूस, कलिंगड आशा शेतीपिकासाठी सेंद्रिय खताचा वापर वाढू लागला आहे. केवळ शेणखत, पालापाचोळा वापरला म्हणजे सेंद्रिय खत वापरले असे होत नाही.

जीवाणू नसल्याने खत जातो वाया
कोकणात खरीप हंगामासाठी सर्वाधिक वापर युरियाचा होतो. युरिया ची गोणी बघितली तर त्या वर ४६:००:०० लिहिले असते. याचा अर्थ या गोणी मध्ये ४६ टक्के नत्र आहे, स्फुरद व पालाश ० टक्के आहे. म्हणजे ५० किलोच्या गोणी मध्ये २३ किलो नत्र असते. हा युरिया टाकल्यानंतर त्यातला जवळपास १२-१४ किलो युरिया पटकन
वापरला जातो व उरलेला युरिया जमिनीत पुरेशे जीवाणू नसल्या कारणाने वाया जातो व पिकला वापरता येत नाही.


रासायनिक खताचे दुष्परिणाम
रासायनिक खतांचा बेसुमार वापरामुळे वातावरणातील नायट्रोजन स्थिरीकरणावर विपरीत परिणा झाला आहे. युरियाच्या वापरामुळे ग्रीन हाऊस गॅस, नायट्रस ऑक्साईड वातावरणात असलेल्या ओझोन थरालाही हानी पोहोचते. किटकनाशकांच्या वापरामुळे शेतातील जीवजंतू (गांडुळासारखे जीव) नष्ट झाले. रासायनिक पदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सेंद्रिय खताकडे येथील शेतकऱ्यांचा कल वाढू लागल्याचे दिसून येत आहे.


अतिवापरातूनही पीक मिळेना
२०-३० वर्षांपूर्वी एक पोत रासायनिक खत टाकल्‍यावर मिळणाऱ्या उत्‍पादनासाठी आता २-३ पोती खताचा वापर करावा लागतो. याचे कारण पूर्वी जमिनीत जीवाणूंची संख्या भरपूर होती. शेतकऱ्यांकडे भरपूर गाई, म्हशी असायच्या. त्यांचे शेण काढून साठवले जायचे, घरातील चुलीतील राख शेतात टाकली जायची, घरातला मृत प्राणी शेतात पुरले जायचे. या सगळ्यामुळे जमिनीत जीवाणूंची संख्या भरपूर असायची. रासायनिक खताच्या वापरामुळे हे जिवाणू नाहीसे झाले..


रासायनिक खताचा वापर
२०२०- २०,६१०
२०२१- १७,७५०
२०२२- १५,६३१
२०२३- १७,४६०


शेतीतील उत्‍पादन वाढवण्यासाठी उपयुक्‍त
*सेंद्रिय पदार्थाचा वापर
*जीवाणू संवर्धकाचा वापर
*हिरवळीचा खतांचा वापर
*एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन
*आच्‍छादनाचा योग्‍य वापर
*पिकांच्‍या अवशेषांचा व अन्‍न प्रक्रियेतील टाकाऊ घटकांचा वापर
*ओल्‍या कच-याचा कंपोस्‍ट करून त्‍याचा वापर
*पिकांची फेरपालट व आंतरपीक पद्धतीचा उपयोग

सेंद्रिय शेती चांगलीच असते. येथील अल्पभूधारक शेतकरी घरातील टाकाऊ पदार्थांचा वापर करतात. लहान प्रमाणात होणाऱ्या शेतीसाठी ही पद्धत उत्तम आहे. परंतु मोठ्या क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या पिकासाठी रासायनिक खताचा वापर केला जातो. काही वर्षांपासून रासायनिक खताचा वापर कमी होत आहे. रासायनिक खताचे अनेक दुष्पपरिणाम येथील शेतकऱ्यांना दिसू लागल्याने बदल केला असावा.
- उज्‍ज्‍वला बाणखळे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी-रायगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com