
डोंबिवलीजवळील तलावात बहीण-भावाचा बुडून मृत्यू
डोंबिवली, ता. २८ ः आपल्या पाळीव श्वानाला तलावात आंघोळीसाठी घेऊन गेलेल्या बहीण आणि भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना रविवारी (ता. २८) डोंबिवलीजवळील दावडी गावात घडली. कीर्ती रवींद्रन (वय १७) आणि रणजीत रवींद्रन (वय २२) अशी दोघांची नावे असून त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे मृतदेह मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. दोघांचे आई-वडील सध्या गावी असून त्यांना झालेल्या घटनेची माहिती देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर परिसरात कीर्ती आणि रणजीत आई-वडिलांसह राहत होते. आई-वडील गावी गेलेले असल्याने ते दोघेच घरी होते. दर रविवारी ते आपल्या लाडक्या श्वानाला आंघोळ घालण्यासाठी दावडी तलाव परिसरात जायचे. त्याप्रमाणे आजही ते गेले होते. तलावाच्या काठी आपली दुचाकी उभी करून ते खाली उतरले. दुपारी १२ च्या सुमारास श्वानाला आंघोळ घालत असताना कीर्तीचा पाय घसरला आणि ती तलावात पडली. तिला वाचवण्यासाठी रणजीतने पाण्यात उडी घेतली. दोघेही बुडू लागल्याने जीव वाचविण्यासाठी धडपडत होते. त्यांची धडपड पाहून श्वान तलावाच्या काठावर उभे राहून भुंकत होता; परंतु आजूबाजूला फारशी वर्दळ नव्हती. श्वानाच्या भुंकण्याचा आवाज एकून तिथे आलेल्या एका ग्रामस्थाने लागलीच इतरांना त्याबाबत माहिती दिली. गावातील पोलिस पाटील गजानन पाटील यांनी त्वरित मानपाडा पोलिस आणि पलावा अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी तलावात शोध घेतला; परंतु दोघांचे मृतदेह त्यांच्या हाती लागले. पोलिसांनी घटनेची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे. रणजीत एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. यंदा तो शेवटच्या वर्षाला होता. कीर्ती बारावीत शिकत होती.
श्वानाची केविलवाणी धडपड
अग्निशमन दलाचे जवान कीर्ती आणि रणजीत रवींद्रन यांचा पाण्यात शोध घेत होते तेव्हा त्यांचा पाळीव श्वान काठावर सतत भुंकत होता. परिसरात सर्वत्र फिरून तो त्यांना शोधत होता. त्याचे भुंकणे पाहून उपस्थित साऱ्यांचे मन हेलावून गेले. दोघांचे मृतदेह हाती लागल्यावर ते रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले. रुग्णवाहिका सुरू होताच श्वानही तिच्या मागे धावू लागला. काही नातेवाईकांनी त्याला धरून ठेवले होते; तरीही त्याचे प्रयत्न सुरूच होते. कीर्ती आणि रणजीत यांची दुचाकी नेण्यात आली तेव्हाही तो तिच्या मागे धावू लागला. श्वानाची केविलवाणी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.