मेट्रो स्थानकाच्या कामाला वांद्रेतील नागरिकांचा विरोध कायम

मेट्रो स्थानकाच्या कामाला वांद्रेतील नागरिकांचा विरोध कायम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः मेट्रो दोन बीच्या मार्गातील ‘नॅशनल कॉलेज रोड’ स्थानक उभारणीच्या आराखड्यात साधू वासवानी उद्यानाचा काही भाग समाविष्ट होत असल्याने स्थानिकांनी या कामास विरोध दर्शविला आहे. स्थानिक आमदार आशीष शेलार यांनीही ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांची भेट घेतल्याचे नमूद करत उद्यान वाचविले जाईल, अशीच भूमिका घेतली आहे. मात्र, स्थानिक आमदार आणि माजी नगरसेवक हे आंदोलनाकडे न फिरकल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
एमएमआरडीएने स्थानक इतरत्र न हलवण्याचा निर्णय घेतल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचे कारण देताना यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ होण्याची आणि अडचणी निर्माण होण्याची शक्यता एमएमआरडीएने व्यक्त केली आहे. याच्या निषेधार्थ रहिवाशांनी शनिवारी (ता. २८) साधू वासवानी उद्यान येथे आंदोलन केले. मेट्रो स्टेशनच्या प्रवेश व बाहेर पडण्याच्या ठिकाणांचे बांधकाम करण्यासाठी एमएमआरडीएने बागेचा काही भाग ताब्यात घेण्याचे ठरविले आहे. त्यास नागरिकांनी विरोध केला आहे. रहिवाशांचा आरोप आहे की, यामुळे असंख्य झाडे तोडण्यात येणार आहेत. त्यापैकी काही झाडे ही शंभर वर्षे जुनी आणि दुर्मिळ प्रजातींची आहेत. एमएमआरडीएने लोकांना माहिती न देता किंवा स्टेशन हलवण्यापूर्वी सूचना आणि हरकती न मागवता स्थानक स्थलांतरित केले आहे.

आम्ही स्थानिकांच्या सोबत ः स्‍वप्ना म्‍हात्रे
माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे म्हणाल्या की, मागील आठवड्यात आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवास यांचीही भेट घेतली आहे. त्या वेळीच त्यांनी अधिकारी या भागात भेट देऊन माहिती घेतील, असे सांगितले. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी या भागात येऊन पाहणी केली आहे. तसेच, या वेळी आम्ही त्यांना नागरिकांच्या समस्या आणि दुसऱ्या काही जागांचे पर्याय सुचविले आहेत. आमची सुरुवातीपासूनच भूमिका होती आणि आहे की आम्ही स्थानिकांच्या सोबत आहोत. जे योग्य आहे, त्यासाठी आमदार आशीष शेलार आणि भाजप नागरिकांच्या सोबत कायमच असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com