
व्यावसायिक वादातून हत्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबईतील कांदिवली येथे रविवारी (ता. २८) एका तरुणाची अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. सदरची घटना कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याची बाब समोर येत आहे. गोळीबार केल्यानंतर मारेकरी तात्काळ घटनास्थळावरून पळून गेला.
मृत तरुण या परिसरात टँकरने पाणीविक्रीचा व्यवसाय करत होता. याच व्यवसायाच्या वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कांदिवली लालजी पाडा परिसरात मागील सहा ते सात महिन्यांतील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात कांदिवली पश्चिमेतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता, तर अन्य तिघे जखमी झाले होते. मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन जणांना गुजरातमधून अटक केली होती.