
सुशोभिकरणात ‘आरे’वर गंडांतर?
सुशोभीकरणात ‘आरे’वर गंडांतर?
स्टॉल हटवण्यासाठी पालिकेचे वरळी दुग्धशाळेला पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः जी-२० च्या मुंबईत होत असलेल्या बैठकांमुळे ‘आरे’ स्टॉलवर संक्रांत येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दक्षिण मुंबईतील ज्या मार्गावरून जी-२० शिष्टमंडळ प्रवास करणार आहे, त्या मार्गावरील सर्व आरे स्टॉल अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र दूध वितरक सेनेने या स्थलांतरास विरोध केला आहे. असे केल्यास स्टॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, तसेच स्टॉलचालकांना आर्थिक फटका बसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई सुशोभीकरण अभियानांतर्गत दिलेल्या आदेशान्वये मध्य मुंबईतील भुलाबाई देसाई मार्ग, डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग, पेडर रोड व इतर काही प्रमुख मार्गांवरील आरे स्टॉल स्थलांतरित करण्याबाबत सहायक अभियंता परिरक्षण (डी) विभाग यांनी प्रभारी व्यवस्थापक वरळी दुग्धशाळा यांना पत्राद्वारे कळवले आहे. दरम्यान, याबाबत आरे दुग्धशाळेचे महाव्यवस्थापक श्रीकांत शिपूरकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
जी-२० चा फटका
आंतरराष्ट्रीय जी-२० परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे. त्यासंदर्भातील बहुतेक बैठका या मुंबई शहरात प्रस्तावित आहेत. सदरील मार्ग हे जी-२० परिषदेचे मार्ग आहेत. त्यामुळे हे मार्ग मोकळे करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने डी विभागातील पेडर रोड, नेपियन्सी रोड, भुलाबाई देसाई रोड, पुरंदरे मार्ग, नेताजी सुभाषचंद्र मार्ग व वाळकेश्वर रोड वगळून हे स्टॉल इतरत्र स्थलांतरित करण्याची कारवाई करण्यात यावी, अशी विनंती प्रभारी व्यवस्थापक वरळी दुग्धशाळा यांना करण्यात आली आहे. यानंतर केलेल्या कारवाईबाबत विभागास अवगत करावे असे ही कळवले आहे.
स्टॉलचे नुकसान होण्याची भीती
दूध योजनेंतर्गत मागील ५० वर्षांपासून आरे दूध केंद्र, सरिता व एनर्जी केंद्र अधिकृतपणे कार्यरत आहेत. या केंद्रांवर केंद्र संचालक आपला दैनंदिन व्यवसाय करून उपजीविका करीत आहेत. काही केंद्र संचालकांनी नुकतीच ही केंद्र दुरुस्त केली आहेत. त्यामुळे ही केंद्र इतरत्र स्थलांतरित करतेवेळी संपूर्ण तोडमोड होण्याची भीती महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाला निवेदन
दूध केंद्रांच्या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य तो मार्ग काढणे गरजेचे आहे. तरच महापालिकेच्या अडचणी दूर होतील व केंद्र संचालकांचेही आर्थिक नुकसान होणार नाही. या अनुषंगाने महाराष्ट्र दूध वितरक सेनेतर्फे दुग्धव्यवसाय विकासचे आयुक्त तसेच मुंबई दूध योजनाचे महाव्यवस्थापक व प्रभारी व्यवस्थापक यांना पत्र देण्यात आले आहे. तसेच त्या पत्राची प्रत पालिकेच्या डी विभागाचे विभागीय अधिकारी व सहायक अभियंता परिरक्षण विभाग यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले. शासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलनाचा इशाराही कदम यांनी दिला आहे.
महापालिकेने सुचवलेल्या ठिकाणी केंद्र स्थलांतरित केल्यास त्याचा दैनंदिन व्यवसाय पूर्वीप्रमाणे होणार नाही. तसेच विजेचे कनेक्शन पुन्हा मिळवण्याकरिता बराच कालावधी जातो. केंद्रामधील साहित्य स्थलांतरित करणे, सुरक्षित ठेवणे अडचणीचे आहे. त्याच्या साहित्य व सामानाचे नुकसान होईल. एकंदरीत महानगरपालिकेच्या सूचनेनुसार केंद्र स्थलांतरित केल्यास केंद्र संचालक आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त होईल.
- राम कदम, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र दूध वितरक सेना