तिकिटासाठी प्रवाशांच्या रांगा

तिकिटासाठी प्रवाशांच्या रांगा

नेरूळ, ता. २९ (बातमीदार)ः मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील नेरूळ स्थानकात प्रतिदिन प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्मार्ट स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्बर मार्गावरील नेरूळ रेल्वे स्थानकात अपुऱ्या तिकीट खिडक्यांमुळे खोळंबा होत आहे.
अपुरे कर्मचारी, स्थानकातील अस्वच्छता, स्थानकाबाहेरील परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान अशा एक ना अनेक समस्यांमुळे नेरूळ स्थानकात प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाने जरी चांगल्या दर्जाची स्थानके उभारली असली, तरी रेल्वे प्रशासन या स्थानकांवर सोयी-सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहे. नेरूळ स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात; मात्र असे असताना स्थानकाच्या पूर्व व पश्चिमेला केवळ एकच तिकीट खिडकी कार्यरत असल्याने प्रवाशांना अर्धा-अर्धा तास रांगेत उभे राहून तिकीट घ्यावे लागत आहे; तर दुसऱ्या बाजूला सहा एटीव्हीएम मशीनपैकी केवळ दोन मशीन सुरू असल्याने दररोज तिकीट खिडक्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
---------------------------------------------------
विनातिकीट प्रवासाला प्रोत्साहन
- नेरूळ स्थानकाच्या जवळ तेरणा हॉस्पिटल, डी. वाय. पाटील कॉलेज अशी मोठी महाविद्यालये आहेत. त्यामुळे वाशी ते पनवेल रेल्वे स्थानकांदरम्यानचे नेरूळ स्थानक मध्यबिंदू आहे. याशिवाय एमआयडीसी, खासगी कंपन्या, कॉपरेट क्षेत्रामुळे हजारो प्रवासी या स्थानकातून दररोज प्रवास करतात.
- नेरूळ स्थानकावर प्रवाशांची कायम वर्दळ पाहायला मिळते; मात्र सर्वाधिक गर्दीच्या या स्थानकात पूर्व व पश्चिम बाजूला असलेल्या असलेल्या दहा तिकीट खिडक्यांपैकी केवळ एकच खिडकी सुरू असल्याने अनेकदा विनातिकीट प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.
---------------------------------------------
स्थानकामध्ये केवळ एकच तिकीट खिडकी चालू असल्याने नागरिकांना बराच वेळ लागत आहे. त्यामुळे घाईच्या वेळेत तिकिटासाठी रांगेत उभे राहणे नकोसे होते.
- जितेंद्र पाटील, प्रवासी
---------------------------------
नेरूळ स्थानकातील समस्यांबाबत वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तिकीट खिडक्या मर्यादित कार्यरत आहेत.
- एस. एम. नायर, स्टेशन प्रबंधक, नेरूळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com