
मनसे भिवंडी तालुकाध्यक्षपदी विकास जाधव
वज्रेश्वरी, ता. २९ (बातमीदार) : भिवंडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी तालुका अध्यक्ष अंबाडी येथील विकास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी हे नियुक्तीपत्र विकास जाधव यांना देण्यात आले. विकास जाधव हे माजी भिवंडी पंचायत समिती सदस्य, तसेच अंबाडी गावचे माजी उपसरपंच होते. तसेच रोटरी क्लब भिवंडी अंबाडी विभाग अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. नुकतेच त्यांनी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून जोरदार लढत दिली होती. त्यांच्या निवडी नंतर मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे, ठाणे व पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव, भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांसह अनेकांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.