
फ्लॅटच्या आगाऊ रकमेचा अपहार
अंधेरी, ता. २९ (बातमीदार) ः कांदिवलीतील एका वयोवृद्ध महिलेकडून घेतलेल्या फ्लॅटच्या टोकन अमाऊंटचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकणी एका पती-पत्नीविरुद्ध चारकोप पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. भरत ठक्कर व नैना ठक्कर अशी यांची नावे असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. तक्रारदार ८८ वर्षांची वयोवृद्ध महिला ही कांदिवलीतील चारकोप परिसरात राहते. तिचा फ्लॅट असून दोन रूम तिने भाड्याने दिले आहेत. तिला तो फ्लॅट विक्री करून नवीन फ्लॅट खरेदी करायचा होता. नोव्हेंबर २०२२ रोजी तिला एका एजंटने भरत ठक्कर याचा फ्लॅट दाखवला. त्याची किंमत एक कोटी चाळीस लाख रुपये एजंटने सांगितली होती. फ्लॅट पसंत पडल्याने तिने तो फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेत भरत व त्याची पत्नी नैना यांना टोकन अमाऊंट म्हणून पाच लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांच्यात मे २०२३ पर्यंत संपूर्ण व्यवहार पूर्ण करून फ्लॅटचा ताबा घेण्याचे ठरले होते; मात्र ही रक्कम दिल्यानंतर ठक्कर कुटुंबीयांकडून तिला काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. फ्लॅटच्या कागदपत्रांची मागणी करूनही त्यांनी तिला कागदपत्रे दिली नाहीत. या फ्लॅटचे या दोघांनी रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी भरली नव्हती. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तिने त्यांच्याकडे पाच लाख परत देण्याची मागणी सुरू केली होती; मात्र या दोघांनी तिला पैसे परत केले नाहीत. तसेच पैसे परत मिळणार नाहीत असा पवित्रा या दोघांनी घेतला होता. त्यामुळे तिने या भरत आणि नैना ठक्करविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.