अनावश्यक कामांना पालिकेचा ब्रेक

अनावश्यक कामांना पालिकेचा ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २९ ः गरज नसतानाही नागरीकांनी मागणी केली आहे म्हणून विकास कामे करून महापालिकेचा पैसा आणि वेळ वाया घालवू नका, अशा शब्दांमध्ये महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विकास कामांना ब्रेक लावला आहे. लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाकडे रस्ते, काँक्रिटचे पदपथ, गटारे, नाले, विसर्जन घाट आदी कामांच्या मागण्यांचा भडिमार झाला आहे. काही दिवसांपूर्वी ऐरोली आणि दिघा परिसराचा धावता दौरा करताना नार्वेकर यांनी संभाव्य कामांची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई शहरात सध्या स्वच्छ भारत सर्वेक्षण, माझी वसुंधरा आणि मान्सूनपूर्व कामे अशा नावाखाली विकास कामांचा सपाटा सुरु आहे. बेलापूर ते ऐरोली दरम्यानच्या सर्वच नोडमध्ये लहान-मोठ्या स्वरूपात काही ना काही कामे केली जात आहेत. स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा लक्षात घेता रंग-रंगोटीपासून ते सौंदर्यकरणापर्यंतची कामे पूर्णत्वास आली आहेत. डांबराचे रस्ते काँक्रीटचे करणे, मुख्य चौकांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण करणे आदी कामे केली जात आहेत. याच कामांमध्ये काही कामे सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींकडूनही प्रशासनाला सुचवली गेली आहेत. सिडकोच्या वसाहतींमधील कामे लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाला सुचवली जात आहेत. त्यात काही नोडमधील चौकांचे काँक्रिटीकरण, तयार असलेले पदपथ तोडून त्याजागेवर स्टँम्पिग काँक्रिटचे पदपथ, अशा मागण्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या आहेत. त्यामुळे मुळात या मागण्यांची गरज नसतानाही लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी केल्याने अशी कामे करू नका, असे आदेश राजेश नार्वेकर यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले आहेत.
--------------------------
शहरात काही ठिकाणी गरज नसतानाही विकास कामे करण्याच्या मागण्या नागरीकांकडून होत आहेत. अशा वेळेस त्या मागणीची चाचपणी करून खरंच गरज आहे की नाही, हे पडताळून कामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यामुळे महापालिकेचे पैसे, श्रम आणि वेळेची बचत होणार आहे.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com