यंदा पाणीकपात अटळ

यंदा पाणीकपात अटळ

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्याच्या घडीला ३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्केने हा पाणीसाठा कमी असून १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी पंधरा दिवसांतून एकदा पाणी कपात एमआयडीसीकडून लागू करण्यात आली आहे. परंतु पाऊस लांबण्याची शक्यता लक्षात घेता ३१ ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करावयाचे झाल्यास ठाणे जिल्ह्यावर पाणी कपात अटळ आहे. ३१ ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. या अतिरिक्त ४५ दिवसांचे नियोजन करावयाचे झाल्यास दिवसातून एक दिवस पाणी कपात करावी लागणार असल्याची शक्यता एमआयडीसीकडून वर्तविण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे स्वतंत्र असे धरण नसल्याने पाणी कपातीचे संकट सतत जिल्ह्यावर घोंघावत असते. एमआयडीसीच्या बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्यानंतर काही प्रमाणात हे पाणी कपातीचे संकट कमी झाले होते. धरणाची उंची वाढून पाणीसाठ्यात वाढ झाल्यानंतर २०२० ते २०२२ हे तीन वर्ष एमआयडीसीला पाणी कपात करावी लागली नाही. मात्र यंदा भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अॅलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रक्रियेमुळे देशातील मॉन्सून पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आणि वाढते तापमान विचारात घेता ३१ ऑगस्टपर्यंत पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरविकास विभागाने राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांना उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणीकपातीचा निर्णय घ्यावा असे आदेश मार्च महिन्यात दिले होते. त्यानुसार केडीएमसीने तत्काळ ही सूचना अमलात आणत उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी ९ मे पासून दर मंगळवारी पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
....
जूनच्या पहिल्या आठवड्यात कपात
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पाणी पुरवठा हा एमआयडीसीमार्फत केला जातो. एमआयडीसीच्या बारवी धरणात सध्या ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागीलवर्षी याच दिवसाला धरणात ३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता १५ जुलैपर्यंत पुरले एवढा पाणीसाठा आहे. मात्र ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरविण्याचा विचार झाल्यास मोठी तूट निर्माण होईल. यामुळे आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करावी लागू शकते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा महिन्याच्या शेवटी ही कपात लागू होऊ शकते अशी शक्यता एमआयडीसी अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
...
नगरविकास विभागाने राज्यातील महापालिका, नगरपालिकांनी ३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. धरणांतील पाणीसाठा लक्षात घेता १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. केडीएमसीने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इतर प्राधिकरणांनी देखील घेणे अपेक्षित आहे. आमच्याकडून देखील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येत आहे.
- नरेंद्र महाजन, कार्यकारी अभियंता, लघू पाटबंधारे विभाग


धरणांतील पाणीसाठा
मे २०२३ मे २०२२
धरणे - पाणीसाठा - टक्केवारी - पाणीसाठा - टक्केवारी
आंध्रा - ११८.५५ - ३४.९६ - ८३.१८ - २४.५३
बारवी - १०९.११ - ३२.२० - १२८.१९ - ३७.८३
मध्य वैतरणा - २१.३१ - ११.०१ - ६८.४३ - ३५.३६
भातसा - ३११.०१ - ३३.०२ - ३५९.५२ - ३८.१६
मोडक सागर - ३७.५० - २९.०९ - ४२.६३ - ३३.०६
तानसा - ३७.४९ - २५.८४ - १६.३५ - ११.२७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com