धारावी उप टपाल कार्यालयात ‘आधार’चे काम ठप्प

धारावी उप टपाल कार्यालयात ‘आधार’चे काम ठप्प

धारावी, ता. ३० (बातमीदार) : धारावीतील नागरिकांना आधार कार्ड काढणे त्‍यातील दुरुस्‍ती यासाठी उपयोगी ठरत असलेले उपटपाल कार्यालयातील केंद्र बंद पडल्‍याने मोठी गैरसोय होत आहे. हे केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी स्‍थानिकांकडून करण्यात येत आहे.
सरकारने टपाल कार्यालयात ‘आधार’ केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, धारावी मुख्य रस्ता उपटपाल कार्यालयात असे केंद्र सुरू झाले नव्हते. पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत राजकीय पक्षांनी या केंद्राचे उद्‌घाटन केले. धारावीत आधार केंद्र सुरू झाल्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त करत होते. हे केंद्र सुरू झाल्यावर काही दिवस नागरिकांना याचा फायदा झाला; मात्र त्यानंतर आधार कार्डाचे काम जवळपास बंद झाले आहे. त्‍यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
नवीन आधार कार्ड काढण्यापासून ते त्यातील दुरुस्त्या करणे, कार्ड गहाळ झाले असेल, तर नव्याने कार्ड काढण्याची सोय धारावीत उपलब्ध नव्हती. धारावीत आधार केंद्र सुरू केले जावे, अशी मागणी होत होती. शासकीय आदेशानुसार डाक कार्यालयात स्थानिकांच्या सोयीकरिता ‘आधार’ केंद्र सुरू झाले होते. केंद्र सुरू झाले, परंतु त्याकरिता पूर्णवेळ कर्मचारी नाही. सध्या या कार्यालयात मोजकेच कर्मचारी व एक उपटपाल मास्तर सर्व कारभार सांभाळतात. गेले काही दिवसांपासून तर हे केंद्र पूर्णपणे बंद आहे. यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे. तातडीने आधार कार्डाचे काम करण्यासाठी खासगी केंद्र अवाच्या सव्वा किमत वसूल करत आहे. यामुळे स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करत आहेत.

काय आहे समस्‍या?
धारावीतील जवळपास १० ते १५ लाख जनतेकरिता एकच टपाल कार्यालय आहे. त्यात सुरू झालेले हे एकमेव आधार केंद्र सध्या बंद असल्यामुळे स्थानिकांची अडचण होत आहे. मुंबईतील बहुतांशी केंद्रांची अशीच अवस्था असल्याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे.

सध्या तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. वरिष्ठांना यासंदर्भात कळवले आहे. लवकरच आधार केंद्र नियमितपणे सुरू राहिला असा प्रयत्न केला जाईल. यासाठी थोडा वेळ लागत आहे.
- शोभा सोनवणे, टपाल मास्तर, धारावी उपडाक कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com