अहवालाविरोधात मच्छीमार आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहवालाविरोधात मच्छीमार आक्रमक
अहवालाविरोधात मच्छीमार आक्रमक

अहवालाविरोधात मच्छीमार आक्रमक

sakal_logo
By

वसई, ता. २९ (बातमीदार) : राज्यातील समुद्र किनारी विविध प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. या नवीन प्रकल्पांचे वादळ किनारी धडकत नाही तोच समुद्री जैवविविधतेबाबत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियोनोग्राफी-एनआयओ) अहवालावर पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या अहवालात सागरी किनाऱ्यावरील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोरल प्रजातींचा उल्लेख करण्यात न आल्याने मच्छीमार समाज देशोधडीला लागण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या संस्थेच्या अहवालाविरोधात एकवटत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पालघर जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा असून, मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. किनारच्या गावांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तींना तोंड देत मच्छीमार खोल समुद्रात मासेमारी करत असताना नव्या प्रकल्पाची चिंतादेखील भेडसावू लागली आहे. कोस्टल रोड, डहाणू येथील वाढवण बंदर, तसेच जिल्ह्याला लागून असणाऱ्या गुजरात मुंद्रा पोर्ट या प्रकल्पात सामुदायिक जैवविविधता सर्वेक्षण करण्यात आले. हे प्रकल्प कोट्यवधी रुपयांचे आहेत. वाढवण येथे होणाऱ्या प्रकल्पामुळे गेली काही वर्षे विरोधाची धार निर्माण झाली आणि ती अद्यापही कायम आहे. येथील मच्छीमारांना धोका निर्माण होऊ शकतो म्हणून आंदोलन, केंद्र व राज्य सरकारला अनेकदा पत्रव्यवहारदेखील करण्यात आले.

सागरी जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे समुद्र किनारी प्रकल्प नको, अशी भूमिका मच्छीमारांकडून घेतली जात आहे; मात्र एनआयओने सर्वेक्षण अहवाल सादर करताना काही बाबी, सागरी प्रजाती यांचा उल्लेख केला नाही, असे अखिल भारतीय मच्छीमार समितीने म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यात मच्छीमार एकवटू लागला आहे. एकीकडे मासेमारीचे प्रमाण कमी झाले आहे. अवेळी पावसाची चिंता, मासळीचे प्रमाण कमी होत आहे, अशातच सागरी जैवविविधतेचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने मच्छीमार बांधव चिंतेत सापडला आहे.

काय आहे प्रकरण?
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने नव्याने उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांमध्ये जैवविविधतेबाबत अहवाल सादर केला आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मध्ये संरक्षित असणाऱ्या ग्रेगोरियन सी-फॅन कोरल या प्रजातींना वगळण्यात आले आहे. या चुकीच्या अहवालामुळे राष्ट्रीय हरित लवादामध्ये मच्छीमारांच्या विरोधात निकाल लागला, असे अखिल भारतीय मच्छीमार कृती समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे या अहवालाविरोधात मच्छीमार बांधव एकत्र आले आहेत.

आंदोलनाची तयारी
मच्छीमार समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांच्या नेतृत्वाखाली जैवविविधता अहवालाविरोधात आंदोलनासाठी बैठक पार पडली. या वेळी महिला अध्यक्षा नयना पाटील, उपाध्यक्ष प्रदीप टपके, पालघर जिल्हाध्यक्ष विनोद पाटील, अभय तामोरे, कुंदन दवणे, उमेश पालेकर, अश्विनी तरे, मुंबई शहर कार्याध्यक्ष मार्शल कोळी, माहीम तालुका अध्यक्ष धीरज तांडेल, वाढवण बंदरविरोधी युवा संघर्ष समिती सदस्य मिलिंद राऊत, सामुद्रिक शास्त्रज्ञ प्राध्यापक भूषण भोईर, पुनित दामोदर तांडेल आदी उपस्थित होते. या बैठकीत १२ जून रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

समुद्रातील १८ एकरच्या जागेवर सी-फॅन ही सामुद्रिक प्रजाती मोठ्या प्रमाणावर असते. एनआयओने सर्व्हेक्षण अहवालात याबाबत उल्लेख केला नाही. एकीकडे मच्छीमार समाज देशोधडीला लागण्याच्या उंबरठ्यावर आहे. या संस्थेच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीकडून १२ जून रोजी वर्सोवा येथील चार बंगला कार्यालयाच्या बाहेर पालघर, मुंबईसह मच्छीमार धरणे आंदोलन करणार आहेत.
- देवेंद्र दामोदर तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

एनआयओच्या संशोधन अहवालाची फेरतपासणी करण्यासाठी, तसेच या संस्थेमुळे मच्छीमार समाजाचे आतापर्यंत झालेल्या नुकसानाची सरकारने दखल घ्यावी. एनआयओ संस्थेकडून पारदर्शक कार्य करण्यासाठी मच्छीमार समितीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील मच्छीमार बांधवांना न्याय मिळाला पाहिजे.
- विनोद पाटील, पालघर जिल्हाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती