
वाढत्या उष्णतेचा साखरेच्या पातळीवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : सध्या वाढलेल्या उन्हामुळे नागरिकांच्या जीवाची काहीली होत आहे. वाढत्या तापमानात घाम निघत असल्याने शरीरातील पाणी कमी होत असून डिहायड्रेशचा त्रास वाढत आहे. सध्या मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये डिहायड्रेशनचा त्रास झाल्याचे अनेक रुग्ण दाखल होत आहेत. यात मधुमेहाचे रुग्ण अधिक आढळत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी वाढत्या उन्हाळ्यात आरोग्याची काळजी आणि योग्य व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे.
बहुतेक लोकांचा न आवडणारा ऋतू म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे आपल्या शरीराची लाहीलाही होते. उन्हाळ्यात उष्णतेमुळे घाम येतो. उच्च तापमानामुळे जीव नकोसा होतो. अशा वेळी घराबाहेर पडताना आपण उष्णतेचा शरीरावर होणाऱ्या परिणामांबाबत खबरदारी घेतो. परंतु मधुमेहींनी विशेषतः जास्त काळजी घेण्याची गरज असते. कारण मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशनचा त्रास जास्त होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात अति उष्म्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे, मधुमेह असणार्या व्यक्तीला खूप घाम येतो. त्या व्यक्तीच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता असते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यातून रक्तातील साखर अधिक वाढते. मात्र, ही समस्या टाळता येणे शक्य असून पाण्याचे सर्वाधिक सेवनावर भर दिला पाहिजे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
ज्यावेळी शरीरामध्ये पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही आणि रक्तात जास्त प्रमाणात साखर तयार होऊन त्याला शोषून घेण्यासाठी तुमचे मूत्रपिंड जास्त काम करत असतील तेव्हा मधुमेह होतो. जर तुमचे मूत्रपिंड अधिक प्रमाणात काम करत असतील, तर शरीर रक्तातील अतिरिक्त साखर मूत्र विसर्जनाद्वारे घालवते. त्यामुळे उन्हाळ्यात मधुमेहींनी आरोग्याची काळजी अधिक घ्यायला हवी.
उन्हाळ्यात पाण्याचे सेवन दुपटीने वाढले पाहिजे. मधुमेहींनी कोल्ड्रिंक्स घेणे टाळावे. ओआरएस घेता येऊ शकते. यासह उन्हाळ्यात कायम छत्री, टोपी, औषधे सोबत ठेवावी. मधुमेहामुळे रोगप्रतिकारकशक्ती आधीच कमी झालेली असती. त्यामुळे, त्यांना सहज इतर संसर्ग होऊ शकतो. रस्त्यावरचे पेय घेऊ नये. लिंबू पाणी, ताक, सब्जा पाणी, कोकमाचे पाणी, पूर्ण आहारावर लक्ष दिले पाहिजे. नियमित व्यायामाने अनेक आजार दूर ठेवता येतात.
- डॉ. अपर्णा संख्ये, प्राचार्या, परिचर्या महाविद्यालय
...............................
थकव्याचा धोका अधिक
अधिक पाणी पिऊन अथवा कॅफिन नसलेले पेय जसे नारळाचे पाणी, साधे ताक किंवा साखर विरहित लिंबू पाणी पिऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण राखता येते. दारूचे सेवन कमीत कमी करावे. कारण दारू निर्जलीकरण करते. मधुमेह असणाऱ्या लोकांना उष्णतेमुळे येणाऱ्या थकव्याचा धोका अधिक असतो आणि उष्णतेशी संबंधित परिस्थितीला ते संवेदनशील असतात. मधुमेह संबंधित काही गुंतागुंत जसे की रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू यांचे नुकसान यांचा परिणाम घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथींवर होऊ शकतो.
..................................
डिहायड्रेशनची समस्या
मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशन होण्याचा धोका अधिक असतो. कारण, रक्तातील साखरेचे जास्त प्रमाण शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते. अधिक जास्त प्रमाणामध्ये द्रवपदार्थ घेऊन डिहायड्रेशनवर उपाय केला जाऊ शकतो. खूप जास्त प्रमाणात डिहायड्रेशन झाले असेल, तर वैद्यकीय आधारभूत सल्ल्यानुसार अतिरिक्त इलेक्ट्रोलाइट्स दिले जाऊ शकतात.
...............................
औषधे आणि संबंधित उपकरणे सांभाळा
उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानाचा मधुमेहाची औषधे, ग्लुकोज मीटर आणि डायबेटिज टेस्ट स्ट्रिप्सवर परिणाम होतो. हवामान उष्ण असते, तेव्हा इन्सुलिन आणि इतर औषधांचा दर्जा खालावतो.
.................
उन्हापासून लांब राहा
मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यात व्यायामाची महत्त्वाची भूमिका असते. पण, उन्हामध्ये व्यायामाचा कोणताही प्रकार करणे चांगले नाही. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तापमान कमी असते तेव्हा बाहेर पडावे.
.............................
हलके कपडे परिधान करा
उष्णतेप्रमाणेच कडक उन्हाचाही शरीरावर परिणाम होतो. बराच वेळ उन्हात राहिल्यानंतर त्वचा पोळते आणि त्याचा तुमच्या मधुमेह नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी नेहमी रुंद कडा असलेली हॅट घाला. त्वचा पोळण्यापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन लावा. हलके आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करणे आवश्यक आहे.
.............................
हे धोके सांभाळा
मधुमेह आणि हृदयविकारासारखे दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींच्या शरीरात अतिरक्त उष्णता होण्याची शक्यता असते. भोवळ येणे किंवा बेशुद्ध पडणे, प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे, स्नायूंमध्ये गोळे येणे, त्वचा थंड किंवा चिकट होणे, डोकेदुखी, हृदयाचे ठोके जलद पडणे आणि/किंवा मळमळ या लक्षणांचा त्यात समावेश आहे. यापैकी एखादे लक्षण दिसले तर लगेचच थंड ठिकाणी जा, पाण्यासारखे पेय प्या.
...........................
नियमित तपासणी आवश्यक
मधुमेह असलेल्या बहुतेक व्यक्तींना डायबेटिक रेटिनोपथी किंवा ग्लोकोमासारखे आजार आधीपासून असतात. या आजारांसोबत व्यक्तींना डोळे येणे किंवा इतर संसर्गासाठी डोळ्यांचे विकार होऊ शकतात. त्यामुळे, प्रत्येक मधुमेहीने नियमितपणे डोळे तपासणे आवश्यक आहे.