एसटी प्रवाशांची ‘तृष्णा’ भागतोय ‘नाथजल’

एसटी प्रवाशांची ‘तृष्णा’ भागतोय ‘नाथजल’

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : उन्हाळी सुट्ट्या लागल्याने लालपरीने मामाच्या गावाला; तसेच कौटुंबिक सहलीसाठी बहुतांश जण अजूनही ये-जा करत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे थंडगार पाणी पिण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लालपरीतून प्रवास करण्याची ‘तृष्णा’ भागवण्यासाठी प्रत्येक आगारात पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यात ठाणे जिल्ह्यातील सात आगारांतून सुमारे ५५ हजार लिटर पाणी दररोज लालपरीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ‘नाथजल’ तृष्णा भागवत आहे.
ठाणे जिल्ह्याच्या आठ आगारांतून लांब, मध्यम आणि शहरी आणि ग्रामीण भागात लालपरी सुसाट धाव आहे. त्यातच सरकारने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलती दिल्या आहेत. त्यामुळे एसटीची प्रवासी संख्या वाढल्याने उत्पन्नही वाढण्यास मदत होत आहे. कोरोना आणि संपाच्या कचाट्यातून बाहेर येऊन लालपरी सुसाट निघाली आहे. आता उन्हाळी सुट्ट्या लक्षात घेत, जादा गाड्यांचे नियोजनही करण्यात आलेले आहे. काही वातानुकूलित बसमधून आरामदायी प्रवास सुरू आहे. मात्र, साध्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अंगातून घामाचा धारा वाहत आहेत. घसाही कोरडा पडत आहे. अनेक प्रवासी यासाठी थंडगार पाणी पिऊन आपली तृष्णा भागवताना दिसत आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने नाथजलातून प्रवाशांची तृष्णा भागवण्यास सुरुवात केली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, बोरिवली, कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि वाडा या आगारांतून दिवसाला एक लिटर आणि अर्ध्या लिटरच्या बाटल्यांमधून ५४ हजार ८०० लिटर पाणी प्रवासी घेत आहेत. यामध्ये ‘नाथजल’ला सर्वाधिक प्रतिसाद हा कल्याण आगारातून मिळाला आहे. यामध्ये एक लिटरच्या १९ हजार, तर अर्ध्या लिटरच्या १० हजार ८०० बाटल्यांचा समावेश आहे.

जास्त किमतीत बाटली विकल्यास होणार दंड
एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी शुद्ध आणि थंडगार पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी एका कंपनीला ठेका दिला आहे. त्या कंपनीमार्फत माफक दरात पाणी उपलब्ध होत आहे. मात्र जास्त किमतीत ती बाटली विकली जात असल्याची तक्रार येत आहेत. जर का ही बाब निदर्शनास आल्यास त्याबाबत आगारप्रमुखांशी संपर्क करावा, असे आवाहन संबंधित विभागाने केले. अशा प्रकरणात दोषीला ५०० ते १ हजार रुपये दंड होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com