इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगचा तिढा सुटला

इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगचा तिढा सुटला

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : ठाणेकरांना कमी तिकीट दारात गारेगार व पर्यावरणभिमुख प्रवास व्हावा, यासाठी ठाणे परिवहनच्या सेवेत १२३ इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. कोपरीतील नवीन सॅटिस ब्रीजजवळ या बस चार्जिंगसाठी सुविधा उभारण्यात येणार आहे. मात्र, या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. या संदर्भात महावितरणचे सह महासंचालक यांच्याशी केलेल्या चर्चेअंती हरिओम नगरच्या केंद्रातून पुरवठा करण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंगचा तिढा सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहरातील झपाट्याने होणारा विस्तार त्याचबरोबर नागरीकरणामुळे शहराच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. ठाणेकरांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या टीएमटी प्रशासनाच्या ताफ्यात असलेल्या अपुऱ्या, नादुरुस्त आणि जुन्या बसगाड्यांमुळे नेहमी नागरिकांकडून टीका करण्यात येत असते. ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि पर्यावरणस्नेही व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाने प्रदूषणविरहित अशा इलेक्ट्रिक आणि सीएनजी बस घेण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत विजेवरील बसगाड्यांच्या खरेदीसाठी उपलब्ध झालेल्या ५८ कोटींच्या निधीतून जीसीसी तत्त्वावर १२३ बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय ठाणे परिवहन प्रशासनाने घेतला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५ बसगाड्या परिवहन प्रशासनाला उपलब्ध झाल्या असून सध्या रस्त्यावर धावत आहेत. या सर्व बससाठी कोपरी येथील नवीन सॅटिस ब्रिजजवळ चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार आहे. मात्र, या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.
ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि परिवहन सभापती विलास जोशी यांनी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार विलास जोशी विद्युत महावितरणचे सह महासंचालक चंद्रकांत डांगे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याने विद्युत महावितरणने आता त्यांच्या हरिओम नगर येथील केंद्रातून या चार्जिंग स्टेशनला वीज पुरवठा करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंगचा तिढा सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

................................

इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंगची समस्या निर्माण झाली होती. पण महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि विद्युत महावितरणचे सह महासंचालक चंद्रकांत डांगे यांच्या प्रयत्नाने ही समस्या सुटली आहे. हरिओम नगर येथील विद्युत महावितरणच्या केंद्रातून आता हा वीज पुरवठा करण्यात येणार आहे.
- विलास जोशी, परिवहन सभापती, ठाणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com