
आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी
अलिबाग (बातमीदार) : आगरी कोळ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीबद्दल समाजमाध्यमांमार्फत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. साखर कोळीवाडा येथील आई एकविरा पदयात्रा ग्रुपमधील मंडळींनी अलिबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक शैलेश सणस यांची भेट घेऊन आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे सोमवारी (ता. २२) केली आहे. यावेळी उमेश मोरे, राकेश गण आदी भक्तगण उपस्थित होते. कार्लेतील एकविरा देवी आगरी कोळ्यांसह सीकेपी व अनेक जाती-धर्मातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अबाल वृद्धांपासून तरुणाई देवीच्या दर्शनाला दरवर्षी जातात. मात्र, समाजमाध्यमावर एका महिलेने देवीबद्दल आक्षेपार्ह विधान केले. या घटनेने भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असतानाच आता त्याचे पडसाद अलिबागमध्येही उमटले आहे. सोमवारी साखर कोळीवाडा येथील भाविकांनी पोलिस निरीक्षक सणस यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.