
अंधेरीत देशीकट्ट्यासह दोघांना अटक
मुंबई, ता. २९ : अंधेरी पश्चिम येथे डी. एन. नगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशी कट्ट्यांसह दोन आरोपींना सोमवारी (ता. २९) पहाटे अटक केली. आरोपींकडे दोन जिवंत काडतुसे सापडली आहेत. भगवान गुजर व सचिन कुशवाह अशी अटक आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी अंधेरी येथील डी. एन. नगर पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मूळचे राजस्थान येथील रहिवासी असून सध्या मालाडच्या मालवणी परिसरात ते वास्तव्यास होते. भगवान गुजर हा रिक्षाचालक असून सचिन कुशवाह हादेखील चालक म्हणून काम करतो. या हत्यारांचा वापर करून आरोपी कोणत्या कारवाया करण्याच्या योजना आरोपींनी आखल्या होत्या, याचा तपास पोलिस करत आहेत.
दोन संशयित व्यक्ती शस्त्रांसह अंधेरी पश्चिम भागात येणार असल्याची माहिती गोपनीय माहितीदारांकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अंधेरी पश्चिम येथील वृंदावन गुरुकुल येथील पदपथावर सापळा रचण्यात आला होता. दोन संशयित रात्री पावणेअकराच्या सुमारास आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. त्या वेळी त्यांच्याकडे दोन देशी कट्टे व दोन जिवंत काडतुसे सापडली. त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि डी. एन. नगर पोलिस ठाण्यात नेले. हत्यार बंदी कायद्यांतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून सोमवारी पहाटे दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन मोबाईलही जप्त करण्यात आले. आरोपींकडे सापडलेल्या देशी कट्ट्यांबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.