क्लस्टर योजना म्हणजे पंचवार्षिक भूमिपूजन घोटाळा

क्लस्टर योजना म्हणजे पंचवार्षिक भूमिपूजन घोटाळा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : सर्वसामान्य ठाणेकरांना क्लस्टर योजनेच्या माध्यमातून घरे देण्याच्या नावाखाली मुख्यमंत्री स्वतःची राजकीय पोळी भाजत आहे. दर पाच वर्षांनी निवडणुका जवळ आल्या की मुख्यमंत्री क्लस्टरच्या नावाने नारळ फोडून भूमिपूजन करण्याचा सोहळा आयोजित करतात. खरं तर हा नागरिकांची फसवणूक करणारा घोटाळा असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी केली आहे.
ठाण्यातील नागरिकांना हक्काची घरे मिळण्यासाठी क्लस्टर योजना अंमलात आली पाहिजे. मात्र या क्लस्टर योजनेचे राजकीय भांडवल करण्याचे काम मागील काही महिन्यांपासून मुख्यमंत्री आणि त्यांचे नेते करत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे नेते यांच्या माध्यमातून क्लस्टरचे राजकारण होत आहे. त्यामुळे ठाणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना क्लस्टर योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्याचा आरोप संजय घाडीगावकर यांनी केला. दर पाच वर्षांनी निवडणुका जवळ आल्या की एखाद्या इमारतीचे भूमिपूजन करून क्लस्टर होणार अशी आश्वासन दिली जातात. प्रत्यक्षात किसन नगर आणि ठाण्यातील नागरिकांना क्लस्टरच्या इमारतीमध्ये राहायला कधी मिळणार? असा प्रश्न संजय घाडीगावकर यांनी उपस्थित केला आहे.

--------------
अनधिकृत बांधकामांकडे लक्ष द्या
एकीकडे मुख्यमंत्री ठाण्यातील धोकादायक इमारतीतील नागरिकांना क्लस्टर योजनेच्या माध्यमातून घर देण्याची घोषणा करतात. तर दुसरीकडे त्याच ठाण्यात मागील पाच वर्षांपासून घोडबंदर, ठाणे, मुंब्रा कळवा, दिवा, माजीवडा मानपाडा, लोकमान्य सावरकर नगर, वर्तकनगर भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. अनधिकृत इमारतीची बांधकामे भविष्यात धोकादायक होवून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री अशा अनधिकृत बांधकामांना आळा का घालत नाहीत? असा सवालदेखील घाडीगावकर यांनी यावेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com