चाकरमान्यांसाठी ३५० जादा गाड्या सोडा

चाकरमान्यांसाठी ३५० जादा गाड्या सोडा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : गणेशोत्सव आणि होळी सणासाठी मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असते; मात्र त्यांना रेल्वेचे आरक्षण तिकीट मिळवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच एका मिनिटात गाड्यांचे आरक्षण फुल होत असल्याने अनेकांच्या हाती वेटिंगचे तिकीट पडत आहे. त्यामुळे चाकरमान्यांची होणारी कोंडी फोडण्यासाठी गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर ३५० जादा गाड्या सोडा, तसेच त्या गाड्यांमध्ये सध्या वेटिंगवर असलेल्या प्रवाशांना आरक्षण तिकीट द्या, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे.

यंदा गणपतीचे आगमन १९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या तिकिटासाठी चाकरमानी चार महिने अगोदर आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना एका विशिष्ट तारखेसाठी खिडकी उघडण्याच्या पहिल्या मिनिटात एक हजारच्या वरची प्रतीक्षा तिकिटे मिळत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई आणि कोकणदरम्यान जादा गाड्या चालवण्याची मागणी तसेच गणेशोत्सव काळात चाकरमान्यांसाठी खास ३५० जादा गाड्या सोडण्याची मागणी केली. तसेच ज्या जादा गाड्या सोडण्यात येतील त्यामध्ये सध्याच्या वेटिंगवरील प्रवाशांना कन्फर्म तिकीट द्यावे, जादा गाड्यांची आगाऊ घोषणा करावी, अशीही मागणी विनायक राऊत यांनी केली. त्याला महाव्यवस्थापकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी शिष्टमंडळात आमदार सुनील प्रभू, रमेश कोरगावकर, विभागप्रमुख सुधीर मोरे, सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी नगरसेवक बाळा नर, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर (बाबी) देव आदी उपस्थित होते.

---------
पँट्री कारचीही मागणी
देश-विदेशातील लाखो पर्यटक वर्षभर कोकणाला भेट देतात. त्यामुळे मंगलोर एक्स्प्रेस, नेत्रावती, मत्स्यगंधा आणि तुतारी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये त्यांच्या आराम आणि सोयीसाठी एसी-१ कोच आणि अनारक्षित डबे जोडण्याची गरज आहे. शिवाय, परदेशी आणि देशी प्रवाशांना चांगल्या दर्जाचे जेवण देण्यासाठी या महत्त्वाच्या गाड्यांमध्ये विशेष पॅंट्री कारचीही मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com