
दृष्टीक्षेप
स्वयंरोजगारासाठी महिलांना साह्य
कांदिवली (बातमीदार) ः कांदिवली पालिकेच्या आर दक्षिण विभागाच्या वतीने आणि भाजप चारकोप विधानसभा यांच्या सहकार्याने स्वयंरोजगारासाठी महिलांना शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्राचे वाटप करण्यात आले. तब्बल ८३७ महिलांनी या यंत्रांचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मंडळ अध्यक्ष, माजी नगरसेवक दीपक तावडे यांनी केले होते. पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गरीब गरजू, महिला बचत गटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी विवीध यंत्रांचे वाटप करण्यात येते. या वर्षी भाजप चारकोप विधानसभेच्या वतीने कांदिवली पश्चिम येथील श्याम सत्संग सभगृहात हे वाटप करण्यात आले. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते यंत्रवाटप कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी माजी नगरसेवक दीपक तावडे, कमलेश यादव, माजी नगरसेविका प्रतिभा गिरकर, लीना देहेरकर, प्रियांका मोरे यांच्या हस्तेदेखील यंत्रवाटप करण्यात आले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी योगेश पडवळ, संतोष जाधव आणि गजानन गवई यांनी विशेष परिश्रम घेतले.
वीर सावरकर स्मारकाचे लोकार्पण
घाटकोपर (बातमीदार) ः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कुर्ला नेहरूनगर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना आमदार विभागप्रमुख मंगेश कुडाळकर यांच्या प्रयत्नातून कुर्ला पूर्व रेल्वे स्टेशनसमोर वीर सावरकरांचे स्मारक उभारण्यात आले असून या चौकाचे वीर सावरकर असे नामकरण करण्यात आले आहे. रविवारी (ता. २८) सायंकाळी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या हस्ते वीर सावरकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी शिवसेना तर्फे सावरकर यांची जयंती साजरी करताना वीरगीत वाजवून सावरकरांचे स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसेना महिला, पुरुष पदाधिकारी, युवा सैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. या दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना आमदार मंगेश कुडाळकर म्हणाले की, वीर सावरकरांचे शिल्परूपी उभारलेले हे स्मारक प्रत्येकाला स्फूर्ती देणारे असून सावरकरांची विचारधारा आपल्या पक्षाच्या कार्यात नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप
मालाड (बातमीदार) ः जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त भाकर फाऊंडेशनमार्फत गोरेगाव पश्चिम येथे भगतसिंगनगर, नयानगर, इंदिरानगर परिसरातील विविध भागांतील तीनशे असंघटित महिला कामगार, एकल महिला व मुलींना फाऊंडेशनचे संस्थापक दीपक सोनावणे यांनी मासिक पाळी दिनाचे महत्त्व सांगून, आरोग्याची काळजी कशी घ्यायची, रुढी परंपरा, गैरसमज या सर्व विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाकर फाऊंडेशनच्या मंगला कुमठे, जाहिदा शेख, मानसी आचरेकर, शाहीन खान, पूजा कांबळे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
कांदिवलीत विकासकामांचे लोकार्पण
कांदिवली (बातमीदार) ः आमदार योगेश सागर यांच्या विकासनिधीतून हिंदुस्थान नाका साईबाबानगर येथे सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच माजी नगरसेवक दीपक तावडे यांच्या प्रयत्नातून व पालिकेच्या आर दक्षिण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बनविण्यात आलेल्या आठ शौचकूप असलेल्या स्वच्छतागृहाचे लोकार्पण आमदार योगेश सागर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास पदाधिकारी योगेश पडवळ, वार्ड अध्यक्ष आर. एस. वर्मा, संतोष जाधव यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते. कांदिवली पश्चिम येथील हिंदुस्थान नाका स्लम विभागात जवळपास ६०० कुटुंबे राहतात. या विभागातील सार्वजानिक स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था झाल्याने स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच परिसरात घटना वाढल्या होत्या. त्यामुळे येथे सीसीटीव्हीची मागणी होत होती. अखेर येथे दोन्ही गोष्ट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
श्री संत रोहिदास दिंडीचे प्रस्थान
धारावी (बातमीदार) : सालाबादप्रमाणे याही वर्षी नियोजित नियमित प्रथेप्रमाणे गेटवे ऑफ इंडिया येथुन आज (ता. ३०) सकाळी दहा वाजता श्री संत रोहिदास दिंडी क्र. २४ चे पंढरपूरसाठी प्रस्थान केले. या वेळी मुंबई व परिसरातील वारकरी व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिंडीचे यंदाचे ४६ वे वर्ष असून वैकुंठवासी ह.भ.प. पांडुरंग कारंडे (कराडकर) यांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांचा मुलगा शिक्षक वारकरी भूषण ह.भ.प. चंद्रकांत कारंडे आणि त्यांचे शिष्य ह.भ.प. पाटील महाराज चालवत आहेत. ही दिंडी संत रोहिदास महाराज दिंडी क्र. २४ या नावाने ओळखली जाते.