कामोठ्यात विजेचा लपंडाव

कामोठ्यात विजेचा लपंडाव

कामोठे, ता. ३० (बातमीदार) : वाढत्या लोकसंख्येमुळे कामोठेत विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. अशातच सध्या अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रावर विजेचा भार येत असल्याने वांरवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच अतिरिक्त उपकेंद्रासाठी सिडकोने जागा मंजूर केली असतानादेखील लालफितीच्या कारभारामुळे उपकेंद्राचे काम रखडल्याने त्याची झळ नागरिकांना बसत आहे.
कामोठे नोडमध्ये १७ ते ३६ सेक्टरमध्ये नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे सध्या विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे जव्हार शाखेतील उपकेंद्रावर अतिरिक्त भार पडत आहे. तसेच उपकेंद्रात तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराला अतिरिक्त उपकेंद्राची मागणी जोर धरत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, सिडकोने ऑक्टोबर २०२१ मध्ये कामोठेतील उपकेद्रांसाठी सेक्टर २५ मध्ये २००० चौरस मीटर भूखंड दिला आहे. तसेच या भूखंडासाठी ३ कोटी २१ लाखांची रक्कम जमा करायला सांगितले होते. पण महावितरणच्या दिरंगाईमुळे सिडकोला अद्याप या भूखंडाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे या भूखंडाची किमत ५ कोटीच्या घरात गेली आहे. त्यामुळे उपकेंद्राचे भवितव्य अंधारात आहे.
-------------------------------------------
सध्याची वीजपुरवठ्याची स्थिती
- साधारण ५७ हजार वीज ग्राहक आहेत. त्यापैकी जव्हार शाखेअंतर्गत १ ते १६ सेक्टरमधील २५ वीज ग्राहक आहेत. कामोठे शाखेच्या कार्यकक्षेत सेक्टर १७ ते ३६ मधील ३२ हजार ग्राहक आहेत.
- जव्हार शाखेच्या कार्यकक्षेत येणारे सर्व सेक्टर सर्वप्रथम विकसित झाले आहेत. येथील वीज ग्राहकांची गरज ओळखून महावितरण कंपनीने सेक्टर ९ येथे उपकेंद्र उभारले आहे. या उपकेंद्राला खारघर येथील अतिउच्च दाब केंद्रातून विजेचा पुरवठा केला जात आहे.
--------------------------------------------
कामोठेत वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त उपकेंद्राची गरज आहे. त्या अनुषंगाने महावितरणकडे पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. अरुणकुमार भगत, माजी नगरसेवक, कामोठे
--------------------------------------------
कामोठे वीज उपकेंद्रासाठी सिडकोने दिलेला भूखंड ताब्यात घेण्यासाठी कार्यालयीन प्रक्रिया सुरू आहे. सुधारित वितरण क्षेत्र योजने अंतर्गत केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर उपकेंद्राच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.
- ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com