दगडखाणींमधून धुळीचे लोट

दगडखाणींमधून धुळीचे लोट

तुर्भे, ता. ३० (बातमीदार) : नवी मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता सध्या विविध कारणांमुळे ढासळली आहे. वायुप्रदूषण आटोक्यात यावे, यासाठी राज्य शासनाने नवी मुंबईतील दगडखाणींवर निर्बंध घातले आहेत; परंतु बंद असलेल्या या दगडखाणींमध्ये विनापरवानगी सुरू असलेले आरएमसी सिमेंट प्लांट पर्यावरणाला घातक ठरत आहेत.
नवी मुंबई शहराच्या पूर्वेला असलेल्या डोंगराळ भागात दगडखाणी होत्या. त्या ठिकाणी मातीचे उत्खनन होत असल्याने हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता. त्यामुळे पंधरा वर्षांपूर्वी या परिसरातील दगडखाणींवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे कधीकाळी दगडखाणींमधील दिवसभर चालणारी धडधड आज जरी बंद झाली असली, तरी सध्या याच ठिकाणांवर आता विविध सिमेंटनिर्मितीचे विविध प्रकल्प उभारले गेले आहेत. दिवसरात्र सुरू असलेल्या या सिमेंट निर्मितीच्या प्रकल्पांमधून नवी मुंबई शहरात धुळीचे लोट येत आहेत. त्यामुळे शहरातील हवाप्रदूषणाला कारणीभूत असलेले हे प्रकल्प बंद करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.
----------------------------------
माहिती अधिकारातून धक्कादायक खुलासा
सिडकोच्या भूमापन विभागाकडे या सिमेंटनिर्मिती प्रकल्पाची माहिती मागवली गेली होती. या वेळी सिडकोकडून कोणतीही परवानगी न घेता हे प्रकल्प सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ज्या ठिकाणी असे प्लांट आहेत, त्यांचे सर्वे भूमापन विभागाकडून करण्यात आला असून त्याचा अहवाल सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
--------------------------------------------
आरक्षित ठिकाणांवर सिमेंटची निर्मिती
नवी मुंबई क्षेत्रात मौजे- तुर्भे, सर्व्हे नं. ३८७ (पैकी), मौजे- पावणे, सर्व्हे नं. १६३ (पैकी), मौजे - बोनसरी, सर्व्हे नं. २०३ (पैकी), मौजे- कुकशेत, सर्व्हे नं. १८३ (पैकी) व मौजे - शिरवणे, सर्व्हे नं. ३२३ अ (पैकी) येथे दगडखाणींसाठी आरक्षित करण्यात आलेले होते; परंतु आता यातील बहुतांशी ठिकाणी आरएमसी प्लांट उभे राहिले आहेत.
-------------------------------------------------
बेकायदा बांधकामांसाठी रसद
शहरात आजच्या घडीला बेकायदा बांधकामे जलद गतीने पूर्ण होत आहेत. यासाठी आरएमसी सिमेंट प्लांटमधून स्लॅबसाठी सिमेंट पाठवले जाते. त्यामुळे तत्काळ स्लॅब तयार झाल्याने इमारत चार महिन्यांतच तयार होते. त्यामुळे बांधकामांना अप्रत्यक्षपणे रसद पुरवण्याचे काम करत आहेत.
-------------------------------------------------
प्रदूषणकारी आरएमसी सिमेंट प्लांटविरोधात सिडकोकडे तक्रार नोंदवली आहे. हे प्रकल्प सजीवसृष्टीला नामोहरम करणारे आहेत. त्यामुळे कार्यवाही झाली नाही, तर न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
- मंगेश म्हात्रे, पर्यावरणप्रेमी, नवी मुंबई
़----------------------------------------------
महापे ते कळवा या भागात असलेले आरएमसी प्लांटला परवानगी असल्याने त्यांना शासनाने काही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत; पण महापेपासून बेलापूरपर्यंत असणाऱ्या आरएमसी प्लांट बहुतांश विनापरवाना असल्याने त्यांना नोटिसा देऊन कारवाई करण्यात येत आहे.
- विक्रांत भालेराव, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com