वाचन संस्कृतीच्या प्रसारात मराठी ग्रंथ संग्रहालयाचे मोठे योगदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचन संस्कृतीच्या प्रसारात मराठी ग्रंथ संग्रहालयाचे मोठे योगदान
वाचन संस्कृतीच्या प्रसारात मराठी ग्रंथ संग्रहालयाचे मोठे योगदान

वाचन संस्कृतीच्या प्रसारात मराठी ग्रंथ संग्रहालयाचे मोठे योगदान

sakal_logo
By

ठाणे, ता. ३० (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यात वाचन संस्कृतीचे जतन करण्यासह तिचा प्रसार, प्रचार करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाचे मोलाचे योगदान आहे. मराठी ग्रंथसंग्रहालय या संस्थेचा यंदा १३० वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्यानिमित्त १ ते ३ जून अशा तीनदिवसीय कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्‌घाटन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते होणार आहे.
मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे ही संस्था ठाणे जिल्ह्यातील ‘अ’ वर्ग जिल्हा ग्रंथालय आहे. ही संस्था ठाणे जिल्ह्याचे मानबिंदू असून वाचन संस्कृती टिकविणे, वृद्धिंगत करणे तिचा प्रसार, प्रचार करणे यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. या संस्थेला १९९७-१९९८चा सर्वोत्कृष्ट जिल्हा वाचनालय, म्हणून शासनाकडून बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थेने १९६० चे साहित्य संमेलन यशस्वीपणे भरवले होते. १९८८ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनास संस्थेने भरघोस सहाय्य केले होते; तर डिसेंबर २०१० रोजी झालेले संमेलन ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराखाली पार पडले.
यंदा या संस्थेचा १३० वा वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त गुरुवार, १ जून रोजी सायंकाळी ५ वाजता वर्धापनदिन सोहळ्यासह संकेतस्थळाचे उद्‌घाटन आणि वा. अ. रेगे सभागृहात साहित्य पुरस्काराचे वितरण होणार आहे; तर शुक्रवार, २ जून रोजी सायं. ५ वाजता काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर असणार आहेत. यामध्ये दिग्गज कवी कविता सादर करणार आहेत. शनिवार, ३ जून रोजी सकाळी १०.३० वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात मराठी भाषा विचार या विषयावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी आणि डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी सहभागी होणार आहेत. तसेच सायं. ५ वाजता वाचनसंस्कृती, ग्रंथालय आणि आपण या विषयावर दिनकर गांगल , दीपक करंजीकर, मिलिंद बल्लाळ आणि जयू भाटकर यांची महाचर्चा रंगणार आहे. हे सर्व कार्यक्रम मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वा. अ. रेगे सभागृहात पार पडणार आहेत.