पाटकर प्लाझा वाहनतळाला मुहूर्त मिळणार

पाटकर प्लाझा वाहनतळाला मुहूर्त मिळणार

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : शहरात वाहनांची संख्या वाढत असून मुख्य चौकांत त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम उद्‌भवते. डोंबिवली पूर्वेतील बाजी प्रभू चौक, इंदिरा चौक हा शहरात मध्यवर्ती भाग असून मार्केटचा हा केंद्रबिंदू असून येथे रिक्षा थांबा, केडीएमटी थांबा असल्याने हा वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट झाला आहे. या ठिकाणची कोंडी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने सहा वर्षांपूर्वी पाटकर प्लाझा इमारतीत वाहनतळ उभारले. मात्र वापराविना ते तसेच धूळखात पडून होते. अखेर हे वाहनतळ सुरू करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. या वाहनतळाची निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्यास वाहनतळ सुरू होऊन वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
डोंबिवली पूर्वेतील चिमणी गल्ली येथे खासगी विकसकाकडून पाच-सहा वर्षांपूर्वी पाटकर प्लाझा ही पाच मजली इमारत बांधण्यात आली. टीडीआरच्या माध्यमातून बांधलेल्या या इमारतीत तळमजला आणि पहिला मजल्यावर तीन ते चार हजार चौरस फुटांचे वाहनतळ आहे. या वाहनतळात सुमारे ३०० दुचाकी आणि ५० चारचाकी वाहने उभी राहतील, अशी व्यवस्था आहे. महापालिका प्रशासनाच्या ताब्यात ही इमारत येऊनसुद्धा या इमारतीतील वाहनतळ सुरू करण्यास मात्र पालिकेला मुहूर्त मिळत नव्हता. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक अधिकारी यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवरील रिक्षा वाहनतळ बंद करून ते पाटकर प्लाझामधील वाहनतळ जागेत सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. वाहनतळांवर सुमारे २५० हून अधिक रिक्षा एकावेळी प्रवासी वाहतूक करतील, असा आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला होता. मात्र त्यावर पुढे काही हालचाली झाल्या नाहीत.
काही राजकीय अडथळे निर्माण झाल्याने हे वाहनतळ असेच धूळ खात पडून होते. अखेर हे वाहनतळ सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाने मागील वर्षापासून प्रयत्न सुरू केले. गेल्या वर्षी हे वाहनतळ भाडेपट्ट्याने देण्यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली. त्या वेळी ठेकेदाराने अनामत रकमेचा भरणा न केल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द झाली होती. यंदा पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून या वर्षी त्याला कसा प्रतिसाद मिळतो पाहू, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
.....
पार्किंगचा प्रश्न सुटणार
मानपाडा रोड, फडके रोड, नेहरू मैदान, रथ रोड, रामनगर येथील रोड, नेहरू रोड, आगरकर रोड येथे रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी असतात. या वाहनचालकांना वाहन उभे करण्यासाठी वाहनतळाच्या रूपाने सुविधा प्राप्त होईल. त्यामुळे परिसरातील पार्किंगचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
....
डोंबिवलीतील पाटकर प्लाझा इमारतीमधील वाहनतळ सुरू करण्याच्या दृष्टीने ठेकेदार नियुक्तीसाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. प्रतिसाद मिळेल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल. डोंबिवली पूर्व भागातील रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांना वाहनतळ येथे यामुळे जागा उपलब्ध होईल.
- वंदना गुळवे, उपायुक्त, मालमत्ता विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com