चटपटीत खाद्यपर्थांमुळे आजारांना निमंत्रण

चटपटीत खाद्यपर्थांमुळे आजारांना निमंत्रण

मुंबई, ता. ३० : सध्या धावपळीचे युग आणि खाद्य संस्कृतीवर वाढता पाश्चिमात्य प्रभाव यामुळे जंक फूड खाण्याकडे तरुणाईसह सर्वसामान्यांचा कल वाढला आहे. ही जंग फूड संस्कृती आता शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही; तर आता असे अन्नपदार्थ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मिळत आहेत, पण हे पदार्थ चटपटीत आणि त्यांची चव जिभेवर दीर्घकाळ रेंगाळणारी असली तरी या जंकफूडमुळे सर्वसामान्यांचे आरोग्य आणि प्रतिकारशक्ती खालावत असल्याचे आहारतज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
सध्या आपल्या खानपानाच्या पद्धतीत बराच बदल झाला आहे. याचे विपरीत परिणाम तरुण पिढीवर आणि बालकांवर होताना दिसत आहेत. यातून रक्तदाब, मधुमेह, छातीत जळजळ असे अनेक आजार व विकार तरुणांना आपल्या विळख्यात घेत आहेत. अलीकडे जंक फूड, तेलकट पदार्थ खाण्याकडे कल आहे. पूर्वी डाळ, भाज, भाजी, बाजरी, ज्वारी, नाचणी यांची भाकरी आणि गव्हाची चपाती अशा सात्विक जेवणाचा वापर प्रत्येकाच्या आहारात होता, पण आता ही जागा बेकरी उत्पादने, पिझ्झा, बर्गर, बिस्कीट अशा जंक फूड, तेलकट पदार्थांनी घेतली आहे. तसेच आहारातून ज्वारी-बाजरी जवळपास हद्दपार झाली आहे. अशा जीवनशैलीमुळे तरुण पिढी आणि मध्यमवयीन पिढी विविध आजारांनी ग्रस्त आहे. त्यामुळे जंकफूडऐवजी पुन्हा सात्विक आणि आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
....
वजनवाढीची समस्या
पूर्वीच्या काळी प्रत्येक व्यक्ती श्रम करीत होती. त्यामुळे ती सुदृढ राहत होती. आता मात्र यंत्रांचा वापर केला जातो. तसेच अनेकांना बैठे काम असल्याने अन्नातून ग्रहण केलेल्या ऊर्जेचा पुरेपूर वापर होत नाही. त्यामुळे ही ऊर्जा पोटात आणि शरीरात चरबीच्या रूपाने साठवून ठेवली जाते. त्यामुळे अनेकांमध्ये वजनवाढीची समस्या जाणवत आहे.
....
जंक फूड म्हणजे काय?
आजकाल तरुण आणि मुलांमध्ये अशा पदार्थांची खूप क्रेझ आहे. पिझ्झा, बर्ग, पॅटीस, पेस्ट्री, कुकीज, मोमोज, चाऊमीन आणि अशा अनेक पदार्थांचा जंक फूडमध्ये समावेश होतो; तर सोडा, कोल्ड्रिंक, एनर्जी ड्रिंक यांनाही जंक फूड किंवा ड्रिंक म्हटले जाते. चटपटीत चव असणाऱ्या या पदार्थांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
.....
बदलत्या जीवनशैलीत मुले फास्ट फूड आणि जंक फूड जास्त पसंत करतात. यात ते सकस आहारापासून दूर जात आहेत; मात्र वाढत्या वयात सकस आहाराचे महत्त्व हे लहानपणीच समजावून सांगितले तर त्याचा चांगला परिणाम होईल. शारीरिक हालचालींचा अभाव, बैठी जीवनशैली, तणाव, अनियमित मासिक पाळी, अतिप्रमाणात जंक फूड खाणे आणि अनियमित झोपेमुळे अशी व्याधी जडते. वाढत्या वजनामुळे पीसीओएससारखी समस्यादेखील दिसून येते. त्यामुळे बाहेरच्या चटपटीत पदार्थांचे सेवन त्रासदायक ठरते.
- डॉ. बेला वर्मा, बालरोगतज्ज्ञ, जे जे रुग्णालय
....
आरोग्यावर होणारे परिणाम
१) चरबीचे वाढते प्रमाण
२) पचनशक्ती मंदावते
३) मानसिक आरोग्यावर परिणाम
४) रक्तातील साखरेचे वाढते प्रमाण
५) हाडे कमकुवत होण्याचा धोका
६) वाढता लठ्ठपणा
....
रात्रीच्या वेळी खाण्याच्या सवयीमुळे होणारे परिणाम
तळलेले पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, फास्ट फूड अवेळी खाल्ल्याने हृदयावर परिणाम होतो. रात्री झोपायला तयार असतो तेव्हा रक्तदाब १० टक्क्यांनी कमी होणे अपेक्षित असते. पण खाण्याच्या सवयीमुळे ते नेहमीपेक्षा जास्त उंचावते, यामुळे हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. नेहमी रात्रीच्या वेळी हलका आहार घ्यावा. रात्री जड जेवण खाल्ल्याने पोटावर परिणाम होतो. रात्रीची छोटी भूक भागवण्यासाठी पीनट बटर, योगर्ट किंवा प्रोटीन शेकसह सफरचंद किंवा केळी घेऊ शकतात.
.....
स्मरणशक्ती कमी होणे आणि शिकण्याच्या समस्या
अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, जे लोक जंक फूड खातात त्यांची संज्ञानात्मक चाचण्यांमध्ये खराब कामगिरी होते. जंक फूडमुळे तुमची स्मरणशक्ती बिघडू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com