खासगी वाहनचालक मेटाकुटीला

खासगी वाहनचालक मेटाकुटीला

कासा, ता. ३० (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात नागरीकरण व औद्योगिकीकरण झपाट्याने होत आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्यादेखील वाढत आहे, परंतु इंधनाचे वाढते दर आणि एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना सवलत मिळत असल्याने खासगी वाहनांना फटका सहन करावा लागत आहे. परिणामी जिल्ह्यातील खासगी वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत.

पालघर जिल्ह्यात वसई, मनोर, वाडा, तलासरी, बोईसर, डहाणू, सफाळे यासह अन्य परिसरात प्रवासी रिक्षांचा आधार घेत प्रवास करतात. जिल्ह्यात तीन आणि सहा आसनी रिक्षांचे प्रमाण हजारोंच्या वर आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नव्याने परवाने देण्यात येत असल्याने ही संख्या वाढत आहे. अनेक चालक बँकांकडून कर्ज काढून रिक्षाव्यवसाय करतात. यातून येणारे पैसे कर्ज परतफेड आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खर्च करतात, परंतु सद्यःस्थितीत जिल्ह्यातील खासगी वाहनांना व्याजाचे वाढते दर संकटात टाकत आहेत. दुसरीकडे सरकारने महिलांना एसटीने प्रवास करण्यासाठी दिलेली खास सवलत पाहता खासगी वाहनांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकणार, हा प्रश्न सतावू लागला आहे.

केवळ वेळ खर्ची
पूर्वी रोज ८०० रुपये रिक्षा व्यवसायातून मिळत होते; मात्र सध्या एका फेरीसाठी अनेक वेळ प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच ३०० रुपयेदेखील मिळत नाहीत. निम्म्यापेक्षा कमी व्यवसाय होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची चिंता वाढू लागली आहे.

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त
चारोटी नाका येथून वापी (गुजरात) दिशेने जवळपास १५ ते २० रिक्षा धावतात; तर चारोटी ते घोडबंदर २५ ते ३० प्रवासी वाहने आहेत. चारोटी ते वापी आणि चारोटी ते घोडबंदर प्रति प्रवासी १०० रुपये भाडे आकारले जाते; मात्र फेऱ्यांची संख्या फारच कमी झाली आहे. त्यामुळे महागाईत वाहन दुरुस्ती, देखभाल व इंधन खर्च यांचा बोजा वाढू लागला आहे.

बेरोजगार असल्याने बँकेकडून कर्ज घेत रिक्षा खरेदी केली. व्यवसायदेखील उत्तम होता; मात्र बँकेचे व्याज दरवाढ वाढले. सद्यःस्थितीत प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. कर्जाची परतफेड करण्याइतपत पैसे मिळत नाहीत.
- केतन फरशीधर, वाहनचालक

सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक जास्त प्रमाणात बाहेर जात नाहीत. त्यात शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी वर्ग बाहेर पडत नाही. एसटी महामंडळाकडून महिलांना सवलत मिळत असल्याने त्या बसचा आधार घेतात. याचा परिणाम खासगी प्रवासी वाहतुकीवर होऊ लागला आहे.
- रामजी बोरसा, वाहनचालक

पालघर जिल्ह्यातील खासगी वाहने
परिसर तीन आसनी रिक्षा सहा आसनी रिक्षा
पालघर - १५०० - ४००
बोईसर - ५५०० - ५००
वसई - १६०००- २०००
डहाणू - ९०० - १५०
वाणगाव - १०० - १००
तलासरी - २०० - १५०
बोईसर - ५५०० - ५००
सफाळे - २५० - १००
मनोर - २५० - १५०
वाडा - १०० - १५०
विक्रमगड - ५० - १५०
जव्हार - ५० - १५०
मोखाडा - सहा आसनी ५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com