मिरा-भाईंदरसाठी आणखी चार तरण तलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदरसाठी आणखी चार तरण तलाव
मिरा-भाईंदरसाठी आणखी चार तरण तलाव

मिरा-भाईंदरसाठी आणखी चार तरण तलाव

sakal_logo
By

भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : मिरा, भाईंदर शहरांतील नागरिकांना आणखी चार तरणतलाव मिळणार आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते ४ जून रोजी चार तरणतलावांचे भूमिपूजन केले जाणार आहे. या वेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आयुक्त दिलीप ढोले आदी उपस्थित राहणार आहेत.

महापालिकेच्या भाईंदर पूर्व भागातील क्रीडा संकुलात तरणतलाव उपलब्ध आहे. याशिवाय गेल्या वर्षी तत्कालीन विधानसभेतील विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काशी मिरा भागातील लोढा गृहसंकुलाच्या सुविधा भूखंडावर महापालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरणतलावाचे लोकार्पण करण्यात आले. या दोन तरण तलावांव्यतिरिक्त आणखी चार तरणतलावांचे भूमिपूजन पुढील आठवड्यात केले जाणार आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या काशी मिरा भागातील आरक्षण क्रमांक ३६८, मिरा रोड येथील आरक्षण क्रमांक २३० व आरक्षण क्रमांक २४२, तसेच भाईंदर पूर्व येथील आरक्षण क्रमांक १२२ सी भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदान या चार ठिकाणी ऑलिंपिकच्या आकाराचे तरणतलाव बांधण्यात येणार आहेत. या तरणतलावांसाठी राज्य सरकारने निधी द्यावा, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार मूलभूत सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत राज्य सरकारने तरणतलावांसाठी महापालिकेला निधी दिला आहे.