जाहिरात आर्टिकल

जाहिरात आर्टिकल

जनसामान्यांचा आधार : आमदार भरतशेठ गोगावले
------------
दुर्गम भागातील पिंपळवाडी ते विधानसभा प्रवास
----------------
देवेंद्र दरेकर
-----------------
नेत्याची नाळ ही सामान्य माणसाशी जोडली गेली असेल, तर तो नेता आपोआप सामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळवतो. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे महाड मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले...
------------
१ जून १९६३. महाडचे त्रिविक्रमी आमदार भरतशेठ गोगावले यांचा जन्म साठ वर्षांपूर्वी याच दिवशी महाड तालुक्यातील पिंपळवाडी या दुर्गम भागात झाला. वडील मारुती गोगावले आणि आई विठाबाई गोगावले यांना तीन मुली आणि तीन मुले. त्यातील भरतशेठ हे दुसरे अपत्य. भरतशेठ यांच्या वडिलांना चार भाऊ आणि तीन बहिणी. एकत्र कुटुंब. शेती हेच उपजीविकेचे साधन. शेतीतून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न आणि खाणारी तोंडे अधिक. त्यामुळे हाता-तोंडाची गाठ मोठ्या मुश्किलीनेच पडायची. अशा परिस्थितीत भरतशेठचे बालपण गेले.
खरे तर बालपण भरतशेठ यांनी अनुभवलेच नाही, असेच म्हणावे लागेल. गावातील शाळेत तिसरीपर्यंतचे शिक्षण घेतले. तिसरीत ते नापास झाले आणि त्यांनी थेट मुंबई गाठली. मुंबईतील घाटकोपर येथील पटेल चौकात त्यांचे मोठे काका रहायचे. त्यांच्याकडे भरतशेठ राहू लागले. मुंबईत त्यांनी आपले नववीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच घरोघरी वर्तमानपत्र टाकणे, दूध वाटणे अशी किरकोळ कामे आणि वॉचमनची नोकरी करून ते आपल्या कुटुंबाला हातभार लावत होते. त्या काळात मुंबईत शिवसेना मूळ धरत होती. कोकणातील चाकरमानीच मुंबईत शिवसेनेचा खरा आधारस्तंभ होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन भरतशेठदेखील शिवसेनेकडे ओढले गेले आणि शिवसैनिक म्हणून त्यांनी काम करण्यास प्रारंभ केला.
मुंबईतील याच वास्तव्याच्या काळात त्यांचा परिचय त्यांच्या सहचारिणी सुषमा यांच्याशी झाला. हाच परिचय पुढे प्रेमात आणि त्यानंतर विवाहात बदलला. भरतशेठ आणि सौ. सुषमा यांचा प्रेमविवाह आहे. १९८४ मध्ये भरतशेठ आणि सुषमा यांचे लग्न झाले. १९८२ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी मोठा मुलगा म्हणून त्यांच्यावर येऊन पडली. त्या वेळेस भरतशेठ केवळ १९ वर्षांचे होते. आईसह लहान भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे मिळेल ते काम करून ते मुंबईतून आपला आणि गावाकडे असलेल्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.
१९८४ साली विवाह झाल्यानंतर मात्र त्यांनी पत्नीसह गावी पिपळकोंडला परतण्याचा निर्णय घेतला. त्यांचा गावाकडे परतण्याचा हाच निर्णय त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी देणारा आणि त्यांच्या प्रगतीला चालना देणारा ठरला. इतरांच्या बाबतीत गाव सोडून मुंबईला गेल्यानंतर प्रगती होते. भरतशेठच्या बाबतीत मुंबई सोडून गावाकडे आल्यानंतर प्रगतीची दारे खुली झाली, असेच म्हणावे लागेल.
गावाकडे, पिंपळवाडीला परतल्यानंतरही कष्ट मात्र संपले नाहीत. गुरे सांभाळणे, शेती करणे ही कामे त्यांनी सुरू केली. जोडीला त्यांनी लाकडाचा व्यवसाय सुरू केला. मुंबईत त्यांच्यातील शिवसैनिक घडला होता. महाड किंवा कोकणात त्या काळात शिवसेना रुजली नव्हती; पण भरतशेठ यांच्या अंगातील शिवसैनिक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. गावाकडे परतल्यानंतर लोकांच्या छोट्या-मोठ्या अडीअडचणी ते सोडवू लागले. आपल्या परीने ते लोकांच्या मदतीला धावून जात असत. त्यातून आपोआप त्यांचे नेतृत्व उदयास येत गेले. त्यांच्या मदत करण्याच्या स्वभावामुळे पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून ते बिनविरोध निवडून आले आणि महाडच्या राजकीय क्षितिजावर त्यांचा उदय झाला. या पहिल्यावहिल्या विजयानंतर मात्र भरतशेठ यांनी मागे वळून पाहिले नाही.
१९९२ साली महाड पंचायत समितीची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली आणि ते निवडूनदेखील आले. त्यानंतर दोन वेळेस त्यांनी आणि दोन वेळेस त्यांच्या पत्नी सुषमा गोगावले यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका शिवसेनेकडून लढवल्या आणि विजयही संपादन केला. भरतशेठ यांनी जिल्हा परिषदेत अर्थ आणि बांधकाम सभापतिपद भूषविले. २००९ मध्ये प्रथम त्यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली. त्या वेळेस जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम सभापती, त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. विधानसभेच्या या पहिल्याच निवडणुकीत विजयाचा षटकार ठोकत त्यांनी विधानसभा गाठली.
२००९, २०१४ आणि २०१९ अशा तीन विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय संपादन केला आहे. लोकांशी थेट संपर्क, संवाद, संघटनकौशल्य यांच्या जोरावर ते आजवर पराभूत झालेले नाहीत. भरतशेठ हे सतत लोकांमध्ये वावरत असतात. ते घरी असोत की रस्त्यावर, कार्यक्रमात असोत की एखाद्या शासकीय बैठकीत. नेहमीच पन्नास शंभर माणसांचा गराडा त्यांच्याभोवती असतो. त्यांचे घर तर सदैव लोकांनी भरलेले असते. अगदी घरातील डायनिंग टेबलपर्यंत लोक पोहोचतात. आणि भरतशेठ कोणतीही नाराजी व्यक्त न करता त्यांना भेटत असतात.
सतत कार्यमग्न असणारे भरतशेठ आपल्या कुटुंबाला वेळ तरी कधी देतात, असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला जातो तेव्हा कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही हे ते प्रामाणिकपणे कबूल करतात; पण त्याच वेळेस आपला मतदारसंघ हेच आपले कुटुंब असल्याचे आम्ही संपूर्ण गोगावले कुटुंबीय मानतो, असे ते आवर्जून सांगतात. माझ्या कुटुंबाचा सर्व भार पत्नी सुषमा यांनी समर्थपणे सांभाळला असल्याने त्या आघाडीवर मी समाधानी आहे. उलटपक्षी ज्या ज्या ठिकाणी मला जाणे शक्य होत नाही, त्या त्या ठिकाणी सुषमा, चिरंजीव विकास जाऊन माझी कमी भरून काढतात, असेही ते सांगतात.
पिंपळवाडी ते विधानसभा असा यशस्वी प्रवास करणाऱ्या आमदार भरतशेठ यांचा पुढचा प्रवास यशाची नवी शिखरे गाठणारा ठरावा, याच त्यांना आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
-------------
गोरगरिबांचा नेता
महाड मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले हे गरिबीतून व हलाखीच्या परिस्थितीतून आलेले असून त्यांना गरिबीची जाण असल्यामुळे गोरगरिबांसाठी ते नेहमी झटत असतात. गोरगरिबांसाठी ज्या काही योजना, विकासकामे करता येतील, त्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात म्हणूनच गोरगरिबांचा नेता म्हणून आमदार भरत गोगावले यांची ओळख आहे.
---------------
विकासकामांचा धूमधडाका
आमदार भरतशेठ गोगावले हे विकासाचे ध्येय घेऊन निघाले असून, मतदारसंघामध्ये रोजच नवनवीन विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटने त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत. गरजूंपर्यंत शासनाच्या विविध योजना ते पोचवत आहेत व यापुढेदेखील विकासकामांचा धूमधडाका ते सुरूच ठेवणार असून, विकासकामे करणारा एकमेव नेता म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com